Marathi Bible Reading | Tuesday 11th October 2022 | 28th Week in Ordinary Time

सामान्यकाळातील २८ वा सप्ताह  

मंगळवार ११ ऑक्टोबर २०२२

जे आत आहे त्याचा दानधर्म करा आणि पाहा, सर्व काही तुमच्यासाठी आहे." 



संत जॉन २३वे पोप

वर्तनसाक्षी  


 अंतर्मनातील स्वार्थ, अहंकार, द्वेष, राग,  आणि दुष्टपणा भरलेला आहे. त्यांचा शोध घेऊन त्या ठिकाणी प्रेम, क्षमा, शांती व परोपकारी कृती कशी वाढविता येईल ह्यावर चिंतन करण्यास प्रभू आपल्याला आज बोलावित आहे.

आपण केवळ बाह्य कर्मकांडात अडकून न पडता आपल्या अंतर्मनात डोकावून पाहू या. प्रभू येशूचा दिव्य प्रकाश आपल्या अंत:करणात पडावा, सर्व | प्रकारच्या दुष्ट व पापी प्रकृतीचा अंधकार दूर व्हावा म्हणून अंतर्मूख बनू या.

✝️   

पहिले वाचन : गलतीकरांस पत्र  ५:१-६
वाचन :पौलचे गलतीकरांस पत्र यातून घेतलेले वाचन 

"ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांची सुंता होण्यात किंवा न होण्यात काही सामर्थ्य आहे असे नाही, प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा जो विश्वास त्याच्यात सामर्थ्य आहे."

स्वातंत्र्याकरिता ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केले आहे म्हणून त्यात टिकून राहा, गुलामगिरीच्या जोखडाखाली पुन्हा सापडू नका.
पाहा, मी पौल तुम्हांला सांगतो की, जर तुम्ही सुंता करून घेतली तर तुम्हांला ख्रिस्ताचा काही उपयोग होणार नाही. सुंता करून घेणाऱ्या प्रत्येक माणसाला मी पुन्हा निश्चितार्थाने सांगतो की, तू संपूर्ण नियमशास्त्र आचरण्यास बांधलेला आहेस. जे तुम्ही नियमशास्त्राने नीतिमान ठरू पाहता त्या तुमचा ख्रिस्ताबरोबरचा संबध नाहीसा झाला आहे, तुम्ही कृपेला अंतरला आहा, कारण आपण आत्म्याच्याद्वारे विश्वासाने नीतिमत्त्वाची आशा धरून वाट पाहत आहो. ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांची सुंता होण्यास किंवा न होण्यास काही सामर्थ्य आहे असे नाही, तर प्रीतीच्याद्वारे कार्य करणारा जो विश्वास त्याच्यात सामर्थ्य आहे.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.



प्रतिसाद स्तोत्र  ११९:४१,४३-४५, ४७-४८
प्रतिसाद :  हे परमेश्वरा, तुझे वात्सल्य मला लाभो.

१ )हे परमेश्वरा, तुझे वात्सल्य मला लाभो. 
तुझ्या वचनानुसार तू सिद्ध केलेले तारण मला प्राप्त होवो.
तू आपले सत्यवचन माझ्या मुखातून 
कधीही नाहीसे होऊ देऊ नकोस, 
कारण मी तुझ्या निर्णयांची आशा धरली आहे.

२) मी तुझे नियमशास्त्र सदासर्वकाळ पाळत राहीन. 
मी राजरोसपणे चालेन, 
कारण मी तुझ्या विधींचा आश्रय केला आहे.

३) मी तुझ्या आज्ञांत आनंद मानीन, 
त्या मला प्रिय आहेत तुझ्या आज्ञा मला प्रिय आहेत 
म्हणून मी आदराने आपले हात उंचावीन 
आणि तुझ्या नियमांचे मनन करीन

जयघोष         
आलेलुया, आलेलुया !  

मी परमेश्वराची अपेक्षा करतो, मी त्याच्या वचनाची आशा धरतो.
 
आलेलुया!

शुभवर्तमान लूक ११:३७-४१
वाचक :   लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

 "दानधर्म करा म्हणजे सर्व काही तुमच्याकरिता कल्याणदायक होईल."

येशू बोलत आहे इतक्यात एका परुश्याने त्याला आपल्याकडे भोजनाला येण्याची विनंती केली, मग तो आत जाऊन भोजनाला बसला. त्याने भोजनापूर्वी हातपाय धुतले नाहीत असे पाहून परुश्याला आश्चर्य वाटले. परंतु प्रभूने त्याला म्हटले, “तुम्ही परुशी ताटवाटी बाहेरून स्वच्छ करता, पण तुमचा अंतर्भाग जुलूम आणि दुष्टपणा ह्यांनी भरला आहे. अहो निर्बुद्ध माणसांनो, ज्याने बहिर्भाग स्वच्छ केला, त्याने अंतर्भागही स्वच्छ केला नाही काय ? तर जे आत आहे त्याचा दानधर्म करा आणि पाहा, सर्व काही तुमच्यासाठी आहे." 

वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 


चिंतन : आज प्रभू येशू आपले अंतःकरण नेहमी चांगले व प्रेमळ असण्यावर भर देत आहे. आपले अंतःकरण हा आपल्या जीवनाचा आरसा असतो. चांगल्या अंतःकरणातून नेहमी चांगले ते बाहेर येत असते. परंतु जे दुष्ट व वाईट गोष्टी आपल्या मनात योजतात त्यांच्या अंतःकरणातून दुसऱ्याचे नेहमी वाईट करण्याचे विचार येतात. अशी | माणसे कुणाचे हित न करता केवळ दुसऱ्याच्या चुकांवर बोट दाखवून त्यांना अपमानित करतात. प्रभू येशूला सुद्धा अनेकांनी विशेष करून शास्त्रीपरुशी ह्यांनी नेहमी अपमानास्पद वागणूक दिली. परंतु प्रभू येशूने कधीच कोणाचे वाईट केले नाही आणि तसा विचारही कधी त्यांच्या मनात आला नाही. उलट त्याने नेहमीच सर्वांचे चांगले तेच केले. प्रभू येशूच्या वचनावर मनन करीत असताना आपण आपल्या जीवनाचे बारकाईने निरीक्षण करू या. माझ्या अंतःकरणात मी काय साठवून ठेवत आहे? देवाने दिलेल्या अनेक महान दानांचा मी दुसऱ्याचे चांगले करण्यासाठी वापर करतो का? माझ्या रोजच्या जीवनात येणाऱ्या गरीब व गरजवंताला मी कोणत्या नजरेने पाहतो? आज प्रभू चरणी बसून आपल्या अंतःकरणात असलेला अहंपणा, मी पणा, राग,  दुसऱ्यांना कमी लेखून त्यांना अपमानित वागणूक देणे हे सर्व वाईट गोष्टी दूर करण्यासाठी व चांगले ते आत्मसात करण्यासाठी मला काय करता येईल ह्यावर चिंतन करू या. 

प्रार्थना : हे प्रभू येशू, अंत:करणापासून तुझा शोध घेण्यास व शुद्धतेचे जीवन  जगण्यास प्रेरणा दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या