सामान्यकाळातील २७ वा सप्ताह
गुरुवार ६ ऑक्टोबर २०२२
तरी त्याच्या आग्रहामुळे त्याला पाहिजे तितक्या भाकरी तो उठून त्याला देईल."
संत ब्रुनो
- मठाधिकारी, वर्तनसाक्षी (१०३५-११०१)
चिंतन : देवासाठी आपण जे युद्ध लढतो त्या युद्धातही जो मनःशांती असते, ती जगात कुठेही मिळत नाही. संत ब्रुनो
प्रभू येशू आज आपल्याला शोधण्यास सांगत आहे. आपण काय शोधावे ? आपण प्रथमतः आपल्या अस्तित्वाचा शोध घ्यावा नंतर निर्माणकर्त्या परमेश्वराचा | शोध घ्यावा. आत्मपरिक्षण करुन स्वतःच्या जीवनातील चांगल्या आणि वाईट वर्तनाचा व घटनांचा शोध घ्यावा. शोधायला सुरुवात केली तर ज्या चांगल्याचा आपण शोध करतो ते सापडतेच. जिद्धीने आपण चांगुलपणाचा शोध घेण्यासाठी प्रेरणा मागू या. ह्या सर्व गोष्टींसाठी देवाच्या दरवाज्यावर सतत ठोठावत राहिले ॥ पाहिजे तरच आपल्या सर्वांसाठी तो दरवाजा उघडणार आहे. आपण काय मागावे, कशाचा शोध घ्यावा आणि नेमके कसे व कुठे ठोठावत राहावे ह्यावर चिंतन करु या.
✝️
पहिले वाचन : गलतीकरांस पत्र ३:१-५
वाचन :पौलचे गलतीकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
"तुम्हाला नियमशास्त्रातील कृत्यांनी आत्मा मिळाला, की, विश्वासपूर्वक श्रवणाने मिळाला ?"
अहो बुद्धिहीन गलतीकरांनो, क्रुसावर खिळलेला येशू ख्रिस्त ज्यांच्या डोळ्यापुढे वर्णन करून ठेवला होता, त्या तुम्हांला कोणी भुरळ घातली आहे ? तुम्हांला नियमशास्त्रातील कृत्यांनी आत्मा मिळाला, की विश्वासपूर्वक श्रवणाने मिळाला, इतकेच मला तुम्हांपासून समजून घ्यावयाचे आहे. तुम्ही इतके बुद्धिहीन आहा काय ? तुम्ही आत्म्याने प्रारंभ केल्यावर
आता देहस्वभावाने पूर्णत्व मिळून पाहत आहा का ? तुम्ही इतकी दुःखे सोसली हे व्यर्थ झाले का ? ह्याला व्यर्थ कसे म्हणावे? जो तुम्हांला पवित्र आत्मा पुरवतो आणि तुम्हांमध्ये चमत्कार घडवून आणतो, तो नियमशास्त्रातील कृत्यांनी करतो की विश्वासपूर्वक श्रवणाने ?
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र : लूक १:६९-७०, ७१-७२, ७३-७५
प्रतिसाद : इस्राएलचा देव प्रभू धन्यवादित असो,
१) देवाने आपल्यासाठी आपला सेवक दावीद
ह्याच्या घराण्यात बलवान उद्धारक
प्रस्थापित केला आहे.
हे त्याने युगाच्या प्रारंभापासून आपल्या
पवित्र संदेष्ट्यांच्या मुखाद्वारे सांगितले होते.
२) आपल्या शत्रूंच्या आणि आपला द्वेष
करणाऱ्या सर्वाच्या हातून सुटका करावी.
अशासाठी की, आपल्या पूर्वजांवर
त्याने दया करावी आणि त्याने आपला पवित्र करार स्मरावा.
३) जी शपथ आपला पूर्वज आब्राहाम
ह्याच्याशी त्याने वाहिली, ती स्मरावी.
ती अशी की, तुम्ही आपल्या शत्रूंच्या हातून
सुटून माझ्यासमोर पवित्रतेने आणि
नीतीने आयुष्यभर माझी सेवा
निर्भयपणे कराल, असे मी करीन
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
हे परमेश्वरा, तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास माझे अंत:करण वळव.
आणि तुझे नियमशास्त्र मला शिकव.
आलेलुया!
शुभवर्तमान लूक ११:५-१३
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"मागा म्हणजे तुम्हांस दिले जाईल."
येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, “तुमच्यामधला कोणी एक आपल्या मित्राकडे मध्यरात्री जाऊन त्याला म्हणतो, 'मित्रा, मला तीन भाकरी उसन्या दे, कारण माझा एक मित्र प्रवासाहून माझ्याकडे आला आहे आणि त्याला वाढायला माझ्याजवळ काही नाही.' पण मित्र आतून उत्तर देईल, 'मला त्रास देऊ नकोस, आता दार लावले आहे आणि माझी मुले माझ्याजवळ झोपली आहेत, मी उठून तुला देऊ शकत नाही.' मी तुम्हांला सांगतो, "तो त्याचा मित्र आहे ह्यामुळे जरी तो उठून त्याला देणार नाही तरी त्याच्या आग्रहामुळे त्याला पाहिजे तितक्या भाकरी तो उठून त्याला देईल." मी तुम्हांला सांगतो, मागा म्हणजे तुम्हांला दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हांला सापडेल, ठोका म्हणजे तुम्हांसाठी उघडले जाते. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो कोणी शोधतो त्याला सापडते जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल. तुमच्यामध्ये असा कोण बाप आहे की जो, आपल्या मुलाने मासा मागितला असता त्याला मासा न देता साप देईल? किंवा अंडे मागितले असता त्याला विंचू देईल? तुम्ही वाईट असताही तुम्हांला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या द्यावयाचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यांस तो किती उदारहस्ते पवित्र आत्मा देईल ?
वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन :
मागणे, शोधणे, ठोठावणे ह्या एखाद्या गरजू व्यक्तीच्या क्रिया आहे. आजच्या शुभवर्तमानात प्रार्थनेचाच विषय पुढे चालू आहे. येशू जो प्रश्न उपस्थित करतो तो म्हणजे विश्वास. आपण असा विश्वास धरितो का की आपण मागितल्यास परमेश्वर पिता ते आपल्याला देईल ? परमेश्वर दयाळू आहे आणि तो आपल्या सर्व गरजा पूर्ण करण्यास तयार आहे. तो पालक किंवा मित्राच्या नैसर्गिक स्वभावापेक्षा कितीतरी पटीने अधिक चांगला आहे. प्रार्थना म्हणजे मागणे, शोधणे आणि ठोकणे. परमेश्वराकडे विनवणी करणे. आयुष्यातील समस्यांची उत्तरे शोधणे आणि अधिक विपुल प्रमाणात जीवनात प्रवेश मिळविण्यासाठी ठोठावणे. आपला विश्वास आहे की, आम्ही जेव्हा जेव्हा मागतो तेव्हा ते आम्हाला दिले जाईल. जेव्हा आम्ही शोधतो तेव्हा ते | आम्हाला सापडेल आणि जेव्हा आम्ही ठोठावतो तेव्हा आमच्यासाठी दार उघडले जाईल.
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्या पवित्र आत्म्याला आम्हामध्ये पाठव, आणि तुला अनुसरण्यास योग्य ती कृपा दे, आमेन
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या