Marathi Bible Reading | Friday 6th January 2023| Christmas weekday

हे नवीन वर्ष आपल्या सर्वाना प्रभूच्या  सहवासात 

सुखाचे व  भरभराटीचे जावो  . 

शुक्रवार   दि. ६ जानेवारी  २०२३

“तू माझा पुत्र, मला परमप्रिय आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे." 

✝️



 संत आंद्रे बसेट 
 वर्तनसाक्षी (१८४५-१९३७)


 ✝️

   

पहिले वाचन १ योहान५:५-१३
वाचक : योहानचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन 

"आत्मा, पाणी व रक्त."

येशू देवाचा पुत्र आहे असा विश्वास जो धरतो त्याच्यावाचून जगावर जय मिळवणारा कोण आहे ? जो पाण्याच्याद्वारे व रक्ताच्याद्वारे आला तो हाच, म्हणजे येशू ख्रिस्त पाण्याने केवळ नव्हे तर पाण्याने व रक्तानेही आला. आत्मा हा साक्ष देणारा आहे, कारण आत्मा सत्य आहे. साक्ष देणारे तिघे आहेत. आत्मा, पाणी व रक्त ह्या तिघांची साक्ष एकच आहे. आपण माणसाची साक्ष स्वीकारतो, पण तिच्यापेक्षा देवाची साक्ष मोठी आहे. जी साक्ष देवाने आपल्या पुत्राविषयी दिली तीच ही त्याची साक्ष आहे. जो देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्या ठायीच साक्ष आहे. ज्याने देवाचा विश्वास धरला नाही त्याने त्याला लबाड ठरविले आहे कारण जी साक्ष देवाने आपल्या पुत्राविषयी दिली आहे तिच्यावर त्याने विश्वास ठेवला नाही. ती साक्ष हीच आहे, देवाने आपल्याला सार्वकालिक जीवन दिले आणि हे जीवन त्याच्या पुत्राच्या ठायी आहे. ज्याला तो पुत्र लाभला आहे त्याला जीवन लाभले आहे.ज्याला देवाचा पुत्र लाभला नाही त्याला जीवन लाभले नाही.

देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्या तुम्हांला सार्वकालिक जीवन लाभले आहे हे तुम्हांला कळावे म्हणून मी हे तुम्हांला लिहिले आहे.

प्रभूचा शब्द 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र १४७:१२-१३,१४-१५,१९-२०
प्रतिसाद :  हे येरुशलेमा, प्रभूचे गुणगान कर !

१ हे येरुशलेमा, प्रभूचे गुणगान कर ! 
हे सियोन, तुझ्या देवाचे स्तवन कर ! 
तुझ्या वेशींचे अडसर त्याने मजबूत राखले आहेत. 
तुझ्यातल्या नागरिकांना आशीर्वाद दिला आहे.

२ तुझ्या सीमेवर तो शांतता राखतो, 
तुला सकस गहू पुरवतो, तो पृथ्वीवर हुकूम सोडतो. 
त्याचा शब्द वेगाने धावत येतो.

३ आपला संदेश त्याने याकोबला, 
आपले नियम व संकेत इस्राएलला जाहीर केले. 
कुठल्याही राष्ट्रासाठी त्याने असे केले नाही. 
त्याचे संकेत त्यांना माहीत नाहीत.



जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
आम्हांमध्ये मोठा संदेष्टा उदयास आला आहे 
आणि देवाने आपल्या लोकांची भेट घेतली आहे.
 आलेलुया!

शुभवर्तमान मार्क १:७-११

वाचक :  मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

 "तू माझा प्रिय पुत्र आहेस. तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे. "

योहान बाप्तिस्ता घोषणा करून म्हणत असे, माझ्यापेक्षा समर्थ असा कोणी एक माझ्यामागून येत आहे. त्याच्या पायतणांचा बंद लवून सोडण्याचीदेखील माझी पात्रता नाही. मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने केला आहे, तो तर तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करणार आहे.

त्या दिवसांत असे झाले की, येशू गालिलातील नाझरेथहून आला आणि लगेच पाण्यातून वर येताना, आकाश दुभंगले आहे, असे त्याला दिसले. तेव्हा आकाशातून अशी वाणी ऐकू आली की, “तू माझा पुत्र, मला परमप्रिय आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे."

वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता,  तुझी स्तुती असो. 


चिंतन :  योहान बाप्तिस्ताने नम्रपणे प्रभू येशूच्या आगमनाची आणि येशूच्या कार्याची साक्ष दिली. बाप्तिस्माच्या वेळी प्रभू येशूवर पवित्र आत्मा उतरला आणि देवपित्याची वाणी झाली की, 'तू माझा पुत्र मला परमप्रिय आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे. ' आपणाला पवित्र आत्म्याठायी बाप्तिस्मा मिळाला आहे.  त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे आपण त्याच्या पुनरुत्थिन जीवनाचे साक्षीदार  बनलो आहोत. म्हणूनच ख्रिस्ताची साक्ष देण्यासाठी आपल्या सर्वांना पाचारण आहे. पवित्र आत्म्याठायी आपण देवाची मुले बनलो आहोत, जोपर्यंत आपण विश्वासात वाढून येशूची साक्ष देत नाही तो पर्यंत आपणाला सार्वकालिक जीवनात सहभागिता मिळणार नाही असे योहान सांगत आहे.
 येशूवरील निष्ठा, नम्रता, आज्ञाधारकपणा आणि परोपकार व सेवा अशा सर्वगुणांनिशी आपण देवाची निष्ठावान मुले बनून त्याच्या प्रीतिची साक्ष जगाला देण्यासाठी प्रयत्नशील बनू या. 

प्रार्थना :  हे प्रभू येशू, तुजवर मनापासून प्रेम करण्यास व तुझ्या इच्छेप्रमाणे  जीवन जगण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️ 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या