Marathi Bible Reading | Saturday 7th January 2023| Christmas weekday

हे नवीन वर्ष आपल्या सर्वाना प्रभूच्या  सहवासात 

सुखाचे व  भरभराटीचे जावो  . 

शनिवार  दि.७ जानेवारी  २०२३

 तूं तर चांगला द्राक्षारस आतांपर्यंत ठेवला आहे. " 

✝️




पेन्याफोर्टचा संत रेमंड -
 मठाधिकारी वर्तनसाक्षी (११७५-१२७५)  

चिंतन: या जगातील राजेमहाराजे स्वतःपुरती संपत्ती साठविण्यात गुंग असतात. ऐश्वर्यसंपन्न असा विश्वाचा राजा मात्र उधळ्या पुत्राच्या बापाप्रमाणे आपल्या प्रजेला सर्व काही पुरविण्यात गुंग असतो.- पेन्याफोर्टचा संत रेमंड

 ✝️

   

पहिले वाचन १ योहान ५:१४-२१
वाचक :योहानचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन

  "आपण जर त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल."

त्याच्यासमोर येण्यास आपल्याला जे धैर्य आहे ते ह्यावरून की, आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल आणि आपण जे काही मागतो ते तो ऐकतो,हे आपल्याला ठाऊक आहे, म्हणून ज्या मागण्या आपण त्याच्याजवळ केल्या आहेत त्या आपल्याला मिळाल्या आहेत हेही आपल्याला ठाऊक आहे.
ज्याचा परिणाम मरण नाही असे पाप करताना आपल्या बंधूला कोणी पाहिले तर त्याने त्याच्याकरिता देवाजवळ मागावे म्हणजे तो त्याला जीवन देईल, अर्थात ज्याचा परिणाम मरण नाही असे पाप करणाऱ्यांना ते देईल. ज्याचा परिणाम मरण आहे असेही पाप आहे आणि ह्याविषयी मागावे असे मी म्हणत नाही. सर्व प्रकारची अनीती पापच आहे, तरीपण ज्याचा परिणाम मरण नाही असेही पाप आहे.
जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करीत नाही, हे आपल्याला ठाऊक आहे. जो देवापासून जन्मला तो (ख्रिस्त) त्याला सुरक्षित ठेवतो आणि त्या दुष्टाचा संपर्क त्याला होत नाही. आपण देवापासून आहो हे आपल्याला ठाऊक आहे. सगळे जग त्या दृष्टाला वश झाले आहे. आपल्याला ठाऊक आहे की, देवाचा पुत्र आला आहे आणि तो सत्य आहे. त्याला ओळखण्याची बुद्धी त्याने आपल्याला दिली आहे. जो सत्य आहे त्याच्या ठायी, म्हणजे त्याचा पुत्र ख्रिस्त ह्याच्या ठायी, आपण आहो हाच खरा देव आणि सार्वकालिक जीवन आहे.
मुलांनो, तुम्ही स्वतःला मूर्तीपासून दूर ठेवा

प्रभूचा शब्द 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र १४९: १-६,९
प्रतिसाद :   प्रभू आपल्या लोकांवर प्रसन्न आहे.

१) एखादे नवीन गीत गाऊन गुणगान करा. 
त्याच्या भक्तजनांच्या मेळाव्यात त्याचे स्तवन करा. 
इस्राएलला त्याचा निर्माणकर्ता आनंदित करो. 
सियोनच्या नागरिकांना त्यांच्या राजामुळे आनंद देवो.

२) नृत्य करीत ते त्याच्या नामाचा महिमा वर्णोत.
 ते डफ व वीणा वाजवून त्याची स्तुती गावोत. 
कारण प्रभू आपल्या लोकांवर प्रसन्न आहे; 
नम्र जनांना तो विजयाने भूषवितो.

३) भक्तजनांना विजयाचा उन्माद चढो. 
अंथरूणांवर त्यांना आनंदाने गजर करू द्या. 
त्यांना मुक्तकंठाने देवाचे स्तवन करू द्या.
हे साऱ्या भक्तजनांचे भूषण आहे.

जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
यहुदियांना प्रकट झालेल्या ख्रिस्ताचा गौरव असो, जगात ज्यावर विश्वास ठेवला गेला त्या ख्रिस्ताचा गौरव असो.
 आलेलुया!

शुभवर्तमान योहान   :-११

वाचक :  योहानलिखित  पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

 तूं तर चांगला द्राक्षारस आतांपर्यंत ठेवला आहे. 

नंतर तिसऱ्या दिवशीं गालीलांतील काना  येथे एक लग्न होते आणि येशूची आई तेथें होती.  येशूला व त्याच्या शिष्यांनाहि लग्नाचें आमंत्रण होतें. मग द्राक्षारस संपला तेव्हां येशूची आई त्याला म्हणाली, त्यांच्याजवळ द्राक्षारस नाहीं.  येशू तिला म्हणाला, बाई, ह्याच्याशी तुझा माझा कायं संबंध ? माझी वेळ अजून आली नाहीं.  त्याची आई चाकरांना म्हणाली, हा तुम्हांला जें कांहीं सांगेल तें करा.  तेथे पाण्याचे सहा दगडी रांजण, यहूद्यांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणें ठेवलेले होते; त्यांत दोन दोन, तीन तीन मण पाणी मावेल असे ते होते.  येशू त्यांना म्हणाला, रांजण पाण्याने भरा, आणि ते त्यांनी कांठोकाठ भरले.  मग त्याने त्यांना सांगितलें, आतां त्यांतलें काढून भोजनकारभाऱ्याकडे न्या; तेव्हां त्यांनी तें . नेलें.  द्राक्षारस बनलेले पाणी भोजनकार- भाऱ्याने जेव्हां चाखलें, (तो द्राक्षारस कोठला आहे हें त्याला ठाऊक नव्हतें, पण पाणी काढणाऱ्या चाकरांना ठाऊक होते,) तेव्हां भोजनकारभारी वराला बोलावून म्हणाला,  प्रत्येक मनुष्य पहिल्याने चांगला द्राक्षारस वाढतो आणि लोक यथेच्छ प्याले मग नीरस वाढतो ; तूं तर चांगला द्राक्षारस आतांपर्यंत ठेवला आहे.  येशूनें गालीलांतील काना येथे आपल्या चिन्हांचा हा प्रारंभ करून आप गौरव प्रगट केलें आणि त्याच्या शिष्यांनीं त्याच्यावर विश्वास ठेवला.

वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता,  तुझी स्तुती असो. 

चिंतन: प्रभू येशू ख्रिस्ताच्या सार्वजनिक कार्याचा प्रारंभ झाला असताना ॥ पवित्र मरियेच्या मध्यस्थिने वैभवी प्रकटीकरण घडले. ह्या चमत्काराद्वारे महत्वाच्या दोन गोष्टी शिकावयास मिळतात. पवित्र मरियामाते जवळ आपण आपल्या अडचणी व गरजा घेऊन गेलो तर ती तिच्या पुत्रापर्यंत त्या पोहचविते. पवित्र मरिया आपल्यासाठी मध्यस्थि करते. त्याचबरोबर दुसरी महत्वाची जाणीव पवित्र मरिया आपल्याला करुन देते, ती म्हणते, 'हा (प्रभू येशू ) तुम्हाला जे काही सांगेल ते करा' ह्याचा अर्थ प्रभू येशूची शिकवण, त्याची वचने व त्याच्या आज्ञा ह्यांचे अनुकरण आपण करायचे आहे. प्रभू येशूच्या वचनात कृपा व सामर्थ्य आहे व त्याच्या कृपेनेच आपल्या जीवनात परिवर्तन घडू शकते.
पवित्र मरियेचा आदर्श समोर ठेवून आपण गरजवंतांच्या सहाय्यास धावून जाऊ या. प्रभू येशूची वाणी ऐकून त्याप्रमाणे आपल्या जीवनात योग्य तो बदल घडवून आणण्यासाठी कृपा व प्रेरणा घेऊ या.


प्रार्थना : हे पवित्र मरिये, तुझ्या आज्ञेचे पालन करण्यास व प्रभू येशूची वाणी ऐकण्यास कृपा मिळावी म्हणून आम्हासाठी विनंती कर, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️ 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या