Marathi Bible Reading | Sunday 8th January 2023| Epiphany ofThe Lord

प्रभू येशूचे प्रकटीकरण 

 रविवार   दि.८ जानेवारी  २०२३

“राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील."




मागी लोक पूर्वेकडून यरुशलेम येथे आले


ख्रिस्तसभा आज तीन मागी राजांना झालेले प्रभू येशू बाळाचे प्रकटीकरण "

सण  साजरा करीत आहे. केवळ आकाशात दिसलेल्या अद्भूत ताऱ्याच्या दिशेने आलेले तीन मागी राजांनी यहुद्यांच्या राजाचा म्हणजेच येशू बाळाचा शोध घेतला. हजारो मैलाचा प्रवासउंटावर  करुन त्यांनी बेथलेहेम  गावाचा  शोध करून  हेरोद राजाकडे न जात त्यांनी  बाळयेशू चे दर्शन घेतले. मौल्यवान द्रव्य, सोने, उद आणि गंधरस त्यांनी बाळयेशू  राजाला समर्पण केले व शेवटी पाया पडून त्यांनी त्याला (येशूला) नमन केले. राजांच्या राजा समोर ते राजे नम्र होऊन नतमस्तक झाले.

बाळयेशूला भेटण्याची उत्सुकता  त्या तीन ज्ञानी मागी माणसांमध्ये होती जी तळमळ होती व जो आदर होता तो आपल्यामध्ये यावा व आपण  पवित्र मिस्सा बलिदानात प्रभू येशूची भेट घेण्यास  उत्सुकता उत्पन्न व्हावी म्हणून प्रार्थना व चिंतन करू या. 

तीन मार्गी ज्ञानी पुरुषांनी येशू बाळाचे दर्शन जवळून घेतले व ते धन्य झाले. प्रभू येशू तर पवित्र मिस्साबलिदानद्वारे प्रत्यक्ष हजार असून आपल्या अंत:करणात येत असतो. आपल्या जीवनाशी एकरुप होऊन त्याचे प्रेम, आनंद व शांतिचे वरदानाचू निरंतर वाहणारी नदी आपल्याला देत असतो. आपण तर त्या ज्ञानी पुरुषांपेक्षा सुध्दा भाग्यवान आहोत.

जगामध्ये अनेक माणसे आज देवाच्या शोधात आहेत. आपल्याला मिळालेला शांतिचा राजा व जीवनदाता प्रभू आपण आपल्या शब्दाद्वारे व कृतिद्वारे इतरांपर्यत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील बनू या. 

पहिले वाचन यशया  ६०:१-६
वाचक :यशयाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन

“परमेश्वराचे तेज तुझ्यावर उदय पावले आहे."

ऊठ, प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझ्याकडे आला आहे. परमेश्वराचे तेज तुझ्यावर उदय पावले आहे. पाहा, अंधकार पृथ्वीला झाकत आहे. निबिड काळोख राष्ट्रांना झाकत आहे, पण तुझ्यावर परमेश्वर उदय पावत आहे. त्याचे तेज तुझ्यावर दिसत आहे. राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील. राजे तुझ्या उदयप्रभेकडे येतील. तू आपले डोळे वर करून चोहोकडे पाहा. ते सर्व एकत्र होत आहेत. तुझ्याकडे येत आहेत. तुझे पुत्र दुरून येत आहेत. तुझ्या कन्यांना कडेवर बसवून आणत आहेत. हे पाहशील तेव्हा तुझ्या मुखावर आनंद चमकेल तुझ्या हृदयाला स्फुरण येऊन ते विकास पावेल, कारण समुद्राकडून विपुल धन तुझ्याकडे लोटेल. राष्ट्राची संपत्ती तुझ्याकडे येईल. उंटांच्या झुंडी, मिद्यान व एफ्रा येथील तरुण उंट तुला व्यापून टाकतील. सर्व लोक सोने व ऊद घेऊन शबा येथून येतील. परमेश्वराचा आनंदभराने गुणानुवाद करतील.
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र  ७२:१-२,७-८,१०-१३
प्रतिसाद :  प्रभो, सर्व राष्ट्र, तुला दंडवत घालतील.

१) हे देवा, तू आपले न्यायानुशासन राजाला दे. 
राजपुत्राला आपली धर्मनीती शिकव. 
तो नीतीने तुझ्या लोकांचा न्याय करील, 
तुझ्या दीनांचा निवाडा न्यायबुद्धीने करील.

२) त्याच्या काळी धार्मिक उत्कर्ष पावतील 
आणि चंद्र नाहीसा होईपर्यंत विपुल शांती असेल. 
समुद्रापासून महासागर आणि 
नदीपासून पृथ्वीच्या दिगंतापर्यंत तो प्रभुत्व चालवील.

३) तार्शीश व द्वीपे यांचे राजे नजराणे आणतील. 
शबा व सबा यांचे राजे खंडणी देतील. 
सर्व राजे त्याला दंडवत घालतील. 
सर्व राष्ट्रे त्याची सेवा करतील.

४) कारण धावा करणाऱ्या दरिद्री, 
दीन व अनाथ यांना तो सोडवील. 
दुबळ्यांवर तो दया करील, दरिद्र्यांचे जीव तो तारील.

दुसरे वाचन इफिसकरांस पत्र ३:२-३,५-६
वाचक : पौलचे इफिसकरांस पत्र यातून घेतलेले वाचन 
“परराष्ट्रीय त्याच अभिवचनाचे वाटेकरी आहेत असे प्रकट झाले आहे. "

देवाची जी कृपा तुम्हांसाठी मलां प्राप्त झाली तिच्या व्यवस्थेविषयी तुम्ही ऐकले असेल, म्हणजे प्रकटीकरणाच्याद्वारे मला रहस्य कळविले गेले. त्याप्रमाणे मी जे थोडक्यात वर लिहिले आहे ते रहस्य जसे आता आत्म्याच्याद्वारे त्याच्या पवित्र प्रेषितांना व संदेष्ट्यांना प्रकट करून दाखवलेले आहे तसे ते इतर पिढ्यांच्या मनुष्य संतानांना कळविण्यात आले नव्हते. ते रहस्य हे की, परराष्ट्रीय लोक ख्रिस्त येशूच्या ठायी सुवार्तेच्या योगाने आम्हांबरोबर वतनबंधू, आम्हांबरोबर एकशरीर व आम्हांबरोबर अभिवचनाचे वाटेकरी आहेत.

हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.


जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहूनत्याला नमन करायला आलो आहोत..
 आलेलुया!

शुभवर्तमान मत्तय  २:१-१२ 

वाचक :  मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन २:१-१२ .

"आम्ही त्याचा तारा पाहून त्याला नमन करायला आलो आहोत."

राजा हेरोदच्या अमदानीत, यहूदिया प्रांतातल्या बेथलेहेम येथे येशूचा जन्म झाला. त्याच्या जन्मानंतर काही मागी लोक पूर्वेकडून यरुशलेम येथे आले आणि विचारपूस करू लागले. “यहुद्यांचा राजा जन्माला आला आहे. तो कुठे आहे? आम्ही त्याचा तारा उगवलेला पाहिला म्हणून त्याला मुजरा करायला आम्ही आलोत.”हे ऐकताच राजा हेरोद आणि त्याबरोबर सारे यरुशलेम घाबरून गेले. त्याने यहुद्यांचे प्रमुख पुरोहित व शास्त्री जमवले आणि त्यांना विचारले, "ख्रिस्ताचा जन्म कुठे व्हायचा आहे ?” “यहुदियातल्या बेथलेहेम" येथे ते म्हणाले; कारण संदेष्ट्यांने लिहिले आहे. "यहुदा प्रांतातल्या बेथलेहेमा, यहुदाच्या सत्ताधीशापेक्षा तू मुळीच कनिष्ठ नाहीस; कारण तुझ्यातूनच एक नेता उदयाला येईल. आणि तो माझ्या इस्राएल लोकांचा प्रतिपालक होईल."

मग हेरोदाने त्या पूर्वेकडल्या मागी लोकांना गुपचूप बोलावून घेतले आणि तारा नक्की केव्हा दिसू लागला याची वेळ विचारून घेतली. नंतर त्यांना बेथलेहेमला जाण्यास सांगून तो म्हणाला, “तुम्ही जा आणि त्या बाळाचा बारकाईने शोध करा. त्याचा पत्ता लागला की मला खबर द्या, म्हणजे मीपण येऊन त्याला मुजरा करीन.” 

राजाच्या सांगण्याप्रमाणे ते निघाले. जाता जाता त्यांना पूर्वी जो तारा पूर्वेस उगवलेला दिसला होता तो पुन्हा दिसू लागला. तो त्यांच्या पुढे पुढे जात होता. मग जेथे ते बाळ होते तेथे तो वर थांबला. तारा पाहून त्यांना खूपच आनंद झाला होता. ते घरात गेले तेव्हा ते बाळ आपली आई मरिया हिच्याजवळ असलेले त्यांना आढळले. बाळाच्या पायावर डोके ठेवून त्यांनी त्याला नमन केले. आपल्या थैल्या सोडून त्याला सोने, ऊद व गंधरस यांचे नजराणे दिले. मग ‘हेरोदाकडे परत जाऊ नका,' अशी स्वप्नात सूचना मिळाल्यामुळे ते दुसऱ्या वाटेने आपल्या देशाला निघून गेले.

वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता,  तुझी स्तुती असो. 


चिंतन: प्रभू येशू ख्रिस्त जरी बेथलेहेम येथे जन्माला आलेला असला, तो दाविदाच्या घराण्यात, यहुदा वंशात आणि यहुदी धर्मात व समाजात जरी जन्मलेला असला तरी सर्वांसाठी या जगात आलेला होता. हे सत्य आजच्या सोहळ्याद्वारे ख्रिस्तसभा साजरे करते. 
राजाच्या शोधात असलेले तीन राजे : तीन मागी लोकांनी (परराष्ट्रीय) ताऱ्याचा मागोवा घेत येरूशलेमपर्यंत प्रवास केला. बायबलमधील भाकित ऐकून ते बेथलेहेमला गेले. येशूबाळाचे दर्शन झाल्यानंतर देवदूतांच्या सूचनेनुसार ते दुसऱ्या मार्गाने आपल्या देशास गेले. ह्या संपूर्ण प्रवासात निसर्ग, बायबल, लोक, देवदूत आणि साक्षात पवित्र कुटुंब ही त्यांच्यासाठी प्रकटीकरणाची विविध साधने बनली. 


प्रार्थना : शांतीच्या राजा, प्रभू येशू ख्रिस्ता, तुझा शांतिदूत होण्यास व तुझी ओळख इतरांना करुन देण्यासाठी मला बळ दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️ 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या