वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"आपल्या वैऱ्यांवर प्रीती कर.'
येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, " 'डोळ्याबद्दल डोळा आणि दाताबद्दल दात' असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हांला सांगतो, दुष्टाला अडवू नका. जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो, त्याच्याकडे दुसरा गाल कर; जो तुझ्यावर फिर्याद करुन तुझी बंडी घेऊ पाहतो त्याला तुझा अंगरखाही घेऊ दे, आणि जो कोणी तुला वेठीस धरून एक कोस नेईल त्याच्याबरोबर दोन कोस जा. जो तुझ्याजवळ काही मागतो त्याला दे आणि जो तुझ्यापासून उसने घेऊ पाहतो त्याला पाठमोरा होऊ नको.
आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती कर आणि आपल्या वैऱ्यांचा द्वेष कर, असे सांगितले होते, ते तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हांला सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. अशासाठी की, तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे; कारण तो वाइटांवर आणि चांगल्यांवर आपला सूर्य उगवतो आणि नीतिमानांवर आणि अनीतिमानांवर पाऊस पाडतो. जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर तुमचे प्रतिफळ काय ? जकातदारही तसेच करतात ना ? आणि तुम्ही आपल्या बंधुजनांना मात्र प्रणाम करीत असला तर त्यात विशेष ते काय करता ? परराष्ट्रीयही तसेच करतात ना? ह्यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: परमेश्वराने मानवाला आपल्या प्रतिमेप्रमाणे निर्माण केलेले आहे. ह्या पृथ्वीतलावरील जीवन जगत असताना माणसाने आपली ही प्रतिमा जपण्यासाठी झटायचे असते. आजची तिन्ही वाचने त्या दृष्टीने आपल्याला मार्गदर्शन करतात. ह्या तीन वाचनांतील तीन वाक्यांवर आपण चिंतन करू या.
अ. “मी, परमेश्वर तुमचा देव जसा पवित्र आहे तसे तुम्हीही पवित्र व्हा.” पावित्र्य हे परमेश्वराचे अंगभूत वैशिष्ट्ये आहे अशी इस्राएली लोकांची धारणा होती. पवित्र कार्यासाठी निवडलेली व्यक्ती परमेश्वर अभिषिक्त करीत असतो, अशा व्यक्तीने इतरांपेक्षा अधिक सात्विकतेने जीवन जगावे अशी इस्राएली लोकांची अपेक्षा होती. आजच्या पहिल्या वाचनात (लेवीय १९:१-२, १७-१८), परमेश्वराचे हे अंगभूत वैशिष्ट्य अंगिकारण्यास आपल्याला पाचारण करण्यात आलेले आहे.
ब. देवाचे मंदिर पवित्र आहे आणि ते तुम्हीच आहात. आजच्या दुसऱ्या वाचनात संत पॉल (१ करिंथ ३:१६-२३) करिंथच्या लोकांना
त्याच्या जीवनातील प्रतिष्ठेची जाणीव करून देतो. तो त्यांना देवाच्या मंदिराची उपमा देतो. इतरत्र त्याने “तुमचे शरीर पवित्र आत्म्याचे मंदिर आहे. " (१ करिंथ ६:१९), असे म्हटलेले आहे. इथे पॉल आपल्याला एक नवा विचार देतो. कोणताही मनुष्य स्वपरिश्रमाने पवित्र बनू शकत नाही. त्याचे ज्ञानदेखील त्याला पवित्र करू शकत नाही. देवाच्या त्याच्याठायी असलेल्या दिव्य उपस्थितीमुळे तो पवित्र बनत असतो.
क. “जसा तुमचा स्वर्गीय पिता परिपूर्ण आहे तसे तुम्ही परिपूर्ण व्हा.” आजच्या शुभवर्तमानात (मत्तय ५:३८-४८) परमेश्वराचे मानवावरील बिनशर्त प्रेम ही त्याच्या परिपूर्णतेची वा पावित्र्याची खूण आहे असे येशू शिकवितो. लूकच्या मते पावित्र्य हे दयाळूपणात दडलेले असते. येशू म्हणतो, “जसा तुमचा स्वर्गीय पिता दयाळू आहे, तसे तुम्हीही दयाळू व्हा.” (लूक ६:३६)
आत्मपरीक्षण : पावित्र्याविषयी माझी संकल्पना कशी आहे? माझ्या जीवनातील कोणकोणत्या बाबतीत परमेश्वर मला पवित्र, दयाळू आणि परिपूर्ण होण्यास बोलावीत आहे ?
प्रार्थना : हे प्रभू परमेश्वरा, पवित्र आचरण करण्यास तुझ्या आज्ञांचे पालन करता यावे म्हणून आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
0 टिप्पण्या