सामान्यकाळातील सहावा सप्ताह
शनिवार दि.१८ फेब्रुवारी २०२३
मेघातून अशी वाणी झाली, “हा माझा प्रिय पुत्र आहे, ह्याचे तुम्ही ऐका."
शुभवर्तमान मार्क ९:२-१३
वाचक : मार्क लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"त्यांच्यादेखत येशूचे रुपांतर झाले."
येशूने पेत्र, याकोब आणि योहान ह्यांना आपणाबरोबर एका उंच पर्वतावर एकीकडे नेले आणि तेथे त्यांच्यादेखत त्याचे रूपांतर झाले. त्यांची वस्त्रे चकचकीत आणि इतकी पांढरीशुभ्र झाली की तितकी पांढरी शुभ्र करणे पृथ्वीवरील कोणालाही परिटाला शक्य नव्हते. तेव्हा मोशेसह एलिया त्यांच्या दृष्टीस पडला; ते येशूबरोबर संभाषण करीत होते. तेव्हा पेत्र येशूला म्हणाला, “गुरुजी, आपण येथे आहोत हे चांगले आहे; तर आम्ही तीन मंडप बनवू आपणासाठी एक, मोशेसाठी एक आणि एलियासाठी एक." काय बोलावे हे त्याला सुचले नाही, कारण ते भयभीत झाले होते. तेव्हा एक मेघ आला आणि त्याने त्यांच्यावर छाया केली आणि मेघातून अशी वाणी झाली, “हा माझा प्रिय पुत्र आहे, ह्याचे तुम्ही ऐका." मग त्यांनी अकस्मात सभोवती पाहिले तो येशूशिवाय त्यांना आपल्याजवळ आणखी कोणी दिसले नाही.
नंतर ते पर्वतावरून उतरत असता त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली की, "तुम्ही जे पाहिले आहे ते मनुष्याच्या पुत्र मृतावस्थेतून पुन्हा उठेपर्यंत कोणालाही कळवू नका." हे बोलणे मनात ठेवून मृतावस्थेतून पुन्हा उठणे म्हणजे काय ह्याविषयी ते एकमेकांना विचारू लागले. मग त्यांनी त्याला विचारले, “पहिल्याने एलिया आला पाहिजे, असे शास्त्री म्हणतात ते कसे ?” त्यांने त्यांना उत्तर दिले, “एलिया पहिल्याने येऊन सर्व काही यथास्थित करतो हे खरे आहे; तर मग मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे सोसावी आणि तुच्छ मानले जावे असे त्याच्याविषयी लिहिले आहे त्याचा अर्थ काय? तथापि मी तुम्हांला सांगतो, एलिया तर आलाच आहे आणि त्याच्याविषयी लिहिल्याप्रमाणे त्यांना वाटले तसे त्यांनी त्याचे केले.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
✝️
0 टिप्पण्या