Marathi Bible Reading |Friday 17th February 2023 | 6thWeek in Ordinary Time |

सामान्यकाळातील सहावा  सप्ताह

शुक्रवार  दि.१७ फेब्रुवारी  २०२३

 जर कोणी माझा अनुयायी होऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा, आपला क्रूस उचलून घ्यावा आणि मला अनुसरत राहावे.

✝️



सेर्वाईट संस्थेचे सात पवित्र संस्थापक 
- (तेरावे शतक)

✝️

    इ. स. १२३३ साली इटलीतील फ्लॉरेन्स ह्या ठिकाणी ख्रिस्तसभेतील भिक्षुकांच्या पाचव्या संस्थेची स्थापना झाली. शहरातील अत्यंत प्रतिष्ठीत कुटुंबांतील सात तरूण मुलांना पवित्र मरियेने आपल्या स्वर्गनयन सोहळ्याच्या दिवशी दर्शन दिले. ही मुले त्यावेळी “पवित्र मरियेचे भक्त” “लॉडेसी” नामक संघटनेमध्ये प्रार्थना व भक्ती करण्यात गुंग होते. पवित्र मरियेने सेवक (सेवाईट) नामक संघ  स्थापन करण्याची इच्छा त्यांच्याजवळ व्यक्त केली.
पवित्र मरियेने आपल्याला दिलेली आज्ञा प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यासाठी हे तरूण शहरापासून ११ मैल दूर मोन्ते सिनारियो नामक एकांत जागी गेले. ह्या ठिकाणी पवित्र मरिया पुन्हा त्यांना भेटली व आपल्या दुःखाचे आणि क्रुसाजवळील वेदनेचे प्रतीक म्हणून ह्या तरुणांनी काळे अंगरखे वापरावेत अशी मार्गदर्शक सूचनादेखील केली आणि संत अगस्तीनच्या आचारसंहितेवर आधारीत संघ स्थापन करण्याच्या विनंतीचा तिने पुनरुच्चार केला.
हा नवा संघ अगदी अद्भुतरित्या पसरत गेला. ५० वर्षामध्ये १०,००० • युवकांनी भिक्षुक म्हणून संघात प्रवेश केला आणि १४ व्या शतकापासून क्रेत बेटावर आणि भारतात १०० हून अधिक शाखा त्यांनी उघडल्या. याशिवाय बंदिस्त खोलीत राहून प्रार्थना करू इच्छिणाऱ्या तरूणींसाठी “क्लॉईस्टर्ड नन्स” (बंदीस्त व्रतस्थ) ची दुसरी संघटना आणि परोपकाराची व शिक्षणदानाची कृत्ये करणाऱ्या उत्साही तरूण तरुणींसाठी एक तिसरी संघटना त्यांनी तेराव्या शतकाच्या अखेरीस स्थापन केली. ह्या तिसऱ्या संघटनेच्या स्थापनेमध्ये संत ज्युलियाना फाल्कोनिएरी (सण ७ फेब्रुवारी) ह्यांचा सिंहाचा वाटा होता.
सेर्वाईट संघाची स्थापना करणाऱ्या संस्थापकांना १८८७ साली संत मालिकेतसामील करण्यात आले. त्यांचे अवशेष एकाच थडग्यांत, मोन्टे सिनारिओच्या, मठख्रिस्तालयात भाविकांसाठी ठेवलेले आहेत.

ख्रिस्तसभेच्या इतिहासात ख्रिस्तासाठी छळ सोसून सुवार्तेसाठी आपले  सर्वस्व समर्पण केलेले अनेक संत महात्मे आहेत. अनेक श्रद्धावंतांनी आत्मत्याग  करुन ख्रिस्ताठायी ऐक्याचे जीवन जगले आहे. आपण कोणता त्याग करुन ख्रिस्ताठायी व सुवार्तेसाठी जीवन जगणार आहोत त्यावर आज चिंतन करु या.. 
 ✝️   

पहिले वाचन उत्पत्ती ११:१-९
वाचक :उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन
"चला, आपण खाली जाऊन त्यांच्या भाषेचा घोटाळा करु. "

सर्व पृथ्वीची एकच भाषा, एकच बोली होती. पुढे असे झाले की, पूर्वेकडे जाता जाता त्या लोकांना शिनार देशात एक मोठे मैदान लागले, तेथे त्यांनी वस्ती केली. ते एकमेकांना म्हणाले, “चला आपण विटा करुन पक्क्या भाजू." त्यांनी दगडाऐवजी विटा आणि चुन्याऐवजी डांबर वापरले. मग ते म्हणाले, “चला आपणांसाठी एक नगर आणि गगनचुंबी शिखराचा एक बुरूज बांधू आणि आपले नाव करू, म्हणजे सर्व पृथ्वीच्या पाठीवर आपली पांगापांग होणार नाही. " तेव्हा मानवपुत्र नगर आणि बुरूज बांधीत होते ते पाहण्यास परमेश्वर उतरला. परमेश्वर म्हणाला, “पाहा, हे लोक एक आहेत, ह्या सर्वांची भाषाही एकच आहे आणि ही ह्यांच्या कृत्यांची सुरुवात आहे आणि हे जे काही करण्याचे योजतील ते करण्यास ह्यांना कशानेही अटकाव होणार नाही. तर चला, आपण खाली जाऊन यांच्या भाषेचा घोटाळा करु, म्हणजे यांना एकमेकांची भाषा समजावयाची नाही.” नंतर परमेश्वराने तेथून त्यांना सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगवले; ह्याप्रमाणे त्यांचे नगर बांधावयाचे राहिले. म्हणून त्या नगराचे नाव बाबेल असे पडले, कारण त्या ठिकाणी परमेश्वराने सगळ्या भाषेचा घोटाळा करून तेथून त्यांस सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगवले.
हा प्रभूचा शब्द 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र  ३३:१०-१५
प्रतिसाद : ज्या लोकांना परमेश्वराने निवडले आहे, ते धन्य !

१.  राष्ट्रांच्या मसलती परमेश्वर निरर्थक करतो, 
लोकांचे संकल्प निष्फळ करतो. 
परमेश्वराची योजना सर्वकाळ टिकते, 
त्याच्या मनातील संकल्प
पिढ्यान्पिढ्या कायम राहतात.

२.  ज्या राष्ट्रांचा देव परमेश्वर आहे, 
ज्या लोकांना त्याने आपल्या वतनाकरिता 
प्रजा म्हणून निवडले आहे, ते धन्य ! 
परमेश्वर आकाशातून पाहतो, 
सर्व मानवजातीला तो निरखतो.

३. तो आपल्या निवासस्थानातून
पृथ्वीवर राहणाऱ्या सर्वांना न्याहाळून पाहतो; 
त्या सर्वांची हृदये घडवणारा आणि 
त्यांची सर्व कामे जाणणारा तो आहे.

जयघोष 
आलेलुया, आलेलुया ! 
देवाने आपणांस सुवार्तेच्या द्वारे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा गौरव प्राप्त करून घेण्यासाठी पाचारण केले आहे. 
 आलेलुया!

शुभवर्तमान मार्क ८:३४-९:१

वाचक :  मार्क लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

    “जो कोणी माझ्याकरिता आणि सुवार्तेकरिता आपल्या जिवाला मुकेल तो स्वतःला वाचवील."

येशूने आपल्या शिष्यांबरोबर लोकांनाही बोलावून म्हटले, “जर कोणी माझा अनुयायी होऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा, आपला क्रूस उचलून घ्यावा आणि मला अनुसरत राहावे. कारण जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो त्याला मुकेल आणि जो कोणी माझ्याकरिता आणि सुवार्तेकरिता आपल्या जिवाला मुकेल तो त्याला वाचवील. कारण मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपल्या जिवाचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ ? किंवा मनुष्य आपल्या जिवाबद्दल काय मोबदला देऊ शकेल ? ह्या व्यभिचारी आणि पापी पिढीमध्ये ज्या कोणाला माझी आणि माझ्या वचनांची लाज वाटेल, त्याची लाज मनुष्याचा पुत्र पवित्र देवदूतांसहित आपल्या पित्याच्या गौरवाने येईल तेव्हा त्यालाही वाटेल."आणखी तो त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला खचित सांगतो की, येथे उभे असणाऱ्यांपैकी काहीजण असे आहेत की, देवाचे राज्य सामर्थ्यानिशी आलेले दिसेपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


चिंतन: उत्पत्तीच्या पुस्तकातील पहिल्या वाचनात आपल्याला “द टॉवर ऑफ बाबेल" ची कथा आहे. आपल्याला भौतिक समृद्धीचे वेड लागलेले लोक दिसतात. त्यांना एक मोठे शहर वसवायचे होते. शहराची रचना आकाशाला भिडणारी असावी. त्यांना स्वतःचे नाव कमवायचे होते. त्यांना शक्ती आणि समृद्धीचे वेड लागू नये म्हणून परमेश्वराने त्यांची भाषा गोंधळात टाकली. शुभवर्तमानामध्ये आपल्याला येशूची शिकवण आढळते जी संपत्तीच्या लोभाच्या विरुद्ध आहे. येशू आपल्या शिष्यांना सांगतो की, त्याचे निवडलेले लोक होण्यासाठी आपण वधस्तंभ उचलला पाहिजे आणि त्याचे अनुकरण केले पाहिजे. तो असेही म्हणतो की, जर तुम्हाला तुमचा जीव वाचवायचा असेल तर तुम्हाला ते सोडण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. सर्व जग मिळवण्यात काही फायदा नाही पण आपला आत्मा गमावून बसला तर काय फायदा. जे येशूच्या या शिकवणीचे पालन करतात तेच प्रभूचे खरे निवडलेले आहेत. आजच्या जगात आपल्याला असे दिसून येते की, आपण संपत्तीच्या संचयाने मोहित झालो आहोत. आपण मिळवलेल्या यशामुळे, आपण बनवलेल्या नावामुळे, आपला अभिमान आणि अहंकार वाढतो. देवाचे खरे निवडलेले लोक आणि येशूचे अनुयायी होण्यासाठी आपण आपला वधस्तंभ उचलून त्याचे अनुकरण करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.

प्रार्थना :  हे प्रभू येशू ख्रिस्ता, आत्मत्याग समर्पण व सुवार्ता प्रसाराचे महत्त्व आम्ही  जाणावे आणि कृतिशील जीवन जगून तुझे खरे अनुयायी बनण्यास आम्हांला प्रेरणा व  शक्ती दे, आमेन..

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या