Marathi Bible Reading |Thursday 16th February 2023 | 6thWeek in Ordinary Time |

सामान्यकाळातील सहावा  सप्ताह

गुरुवार   दि.१६ फेब्रुवारी  २०२३

पेत्रने त्याला उत्तर दिले, “आपण ख्रिस्त आहा

✝️



संत ओनेसिमस
रक्तसाक्षी (९०)

✝️


बायबलच्या नव्या करारात पौलचे फिलेमोनला पत्र नावाचे एक छोटेसे (एक पानाचे) पुस्तक आहे. त्या पुस्तकाच्या उगमाविषयीची घटना संत ओनेसिमस ह्याच्या जीवनाशी संबंधित आहे.कलस्सै येथील फिलेमोन नावाच्या एका श्रीमंत मनुष्याच्या घरी ओनेसिमस नावाचा एक अख्रिस्ती गुलाम कार्य करीत होता. एकदा त्याच्या हातून काहीशी चूक घडली. शिक्षा होण्याच्या भीतीने ओनेसिमस आपल्या मालकाला न विचारता घरातून पळून गेला आणि रोम येथे पोहोचला.

नेमका त्याचवेळी (संत) पौल रोममध्ये आपला पहिला तुरूंगवास भोगत
होता. परंतु त्याला नजरकैदेत भेटण्याची खास मुभा देण्यात आली होती. ओनेसिमसआपल्या मनातील भीतीने थरथरत ह्या प्रेषिताच्या भेटीला गेला आणि त्याचवेळी त्याला जणू परिसस्पर्श झाला. त्याची विचारसरणी व जीवनपद्धती तात्काळ बदलून गेली. ओनेसिमसला आपल्या सोबतच ठेवून घेण्याचा संत पौलला मोह झाला.

परंतु पहिल्या प्रथम ज्या मालकाला तो फसवून आलेला आहे त्याच्याशी समेट
करणे आवश्यक होते. त्यामुळे त्याने फिलेमोनला पत्र लिहिले व ओनेसिमस
ह्याला कलस्सै येथे पाठविले.

ह्या पत्रामध्ये ओनेसिमस ह्याला केवळ गुलाम म्हणूनच नव्हे तर ख्रिस्ताठायी बंधू म्हणून फिलेमोनने स्वीकारावे अशी विनंतीवजा आज्ञा एक धर्मपिता या नात्याने पौलने फिलेमोनला केलेली होती. पौलसारख्या महान प्रेषिताचे ते पत्र वाचून फिलेमोनला खूप आनंद झाला. त्याने तात्काळ ओनेसिमस ह्याला क्षमा केली व गुलामगिरीतून मुक्त केले. इतकेच नव्हे तर पुन्हा रोम शहरात जाण्यासाठी आवश्यक ती मदतही पुरविली.
स्वत: फिलेमोन ह्यालाही संत पौलकडूनच ख्रिस्ती धर्माची दीक्षा मिळाली होती. संत पौल इफीस येथे असताना त्याने फिलेमोन ह्या श्रीमंत व्यक्तीचे परिवर्तन घडवून आणले. तिथपासून दोघे एकमेकांचे जिगरी दोस्त बनले. पुढे फिलेमोन इफिस सोडून कलस्सै येथे गेला. त्याच्या ह्या नव्या घरी प्रारंभीचे ख्रिस्ती लोक उपासनाविधीसाठी व प्रार्थनाविधीसाठी एकत्र जमत. अशा फिलेमोनने पौलच्या पत्राचा आदर करणे साहजिकच होते. त्याचाच परिणाम म्हणून ओनेसिमससारखा गुलाम रोम शहरात जाऊन (संत) पौलचा निकटवर्तीय बनला.
काहीकाळ पौलला त्याने तिथे मदत केली आणि नंतर तो पूर्वेकडे निघून गेला. तेथील मासेदोनिया शहरातील बेरोय्या धर्मप्रांताचा बिशप म्हणून ओनेसिमस ह्याने धडाडीने कार्य केल्याचे ख्रिस्ती धर्मपरंपरा मानते.

आपण आज विचार करु या की, प्रभू येशू नक्की आपल्यासाठी कोण आहे? ख्रिस्ताचे आणि आपले कोणते नाते आहे? प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनात कोणते स्थान आहे? प्रभू येशू जर आपल्या जीवनाचा स्वामी आहे तर त्याच्या वचनानुसार आपण जीवन आचरण करुन त्याची सुवार्ता पसरविण्यासाठी वचनबद्ध बनू या.

 ✝️   

पहिले वाचन उत्पत्ती ९:१-१३
वाचक :उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन

"मी मेघांत धनुष्य ठेवले आहे, ते पृथ्वीच्या आणि माझ्यामधल्या कराराचे चिन्ह होईल."देवाने नोहाला आणि त्याच्या पुत्रांना आशीर्वाद देऊन म्हटले, “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका. पृथ्वीवरील सर्व पशू, आकाशातील सर्व पक्षी, भूमीवर रांगणारे सर्व प्राणी आणि समुद्रातील सर्व मासे यांना तुमचे भय आणि धाक राहील; ती तुमच्या स्वाधीन केली आहेत. सर्व संचार करणारे प्राणी तुमचे अन्न होतील. वनस्पती ज्याप्रमाणे तुम्हांला दिली होती त्याप्रमाणे सर्व काही आता तुम्हास देतो. तथापि मांसाचे जीवन रक्त आहे म्हणून रक्तासकट मांस खाऊ नका. मी तुमच्या रक्ताबद्दल म्हणजे तुमच्या जिवाबद्दल झडती घेईन. प्रत्येक पशूची आणि मनुष्याची झडती घेईन. जो कोणी मनुष्याचा रक्तपात करील त्याचा रक्तपात मनुष्याकडून होईल. कारण देवाने मनुष्य आपल्या प्रतिरूपाचा उत्पन्न केला आहे. तुम्ही फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वीवर विपुल वंशवृद्धी करा, तिच्यावर बहुगुणित व्हा."
देव नोहाला आणि त्याच्याबरोबर त्याच्या मुलांना म्हणाला, “पाहा, मी तुम्हांशी आणि तुमच्यामागे तुमच्या संततीशी करार करून ठेवतो; त्याचप्रमाणे तुम्हाबरोबर असलेले सर्व सजीव प्राणी, म्हणजे तुम्हाबरोबर तारवातून बाहेर आलेले पक्षी, ग्रामपशू आणि पृथ्वीवरील इतर सर्व प्राणी ह्यांच्याशीही मी करार करून ठेवतो. तुम्हाशी हा करार करून ठेवतो की पुन्हा जलप्रलयाने प्राणिमात्र नष्ट होणार नाहीत आणि पृथ्वीनाश करणारा जलप्रलय पुन्हा कधी व्हावयाचा नाही." देव म्हणाला, "माझ्यामध्ये आणि तुमच्यामध्ये, त्याप्रमाणेच तुम्हाबरोबर असणाऱ्या सर्व सजीव प्राण्यांमध्ये पिढ्यान्पिढ्या, युगानुयुगे राहणारा जो करार मी करीत आहे त्याचे चिन्ह हे : मी मेघांत धनुष्य ठेवले आहे, ते पृथ्वीच्या आणि माझ्यामधल्या कराराचे चिन्ह होईल."

हा प्रभूचा शब्द 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र  १०२:१६-२१,२९.२२-२३

प्रतिसाद : परमेश्वराने स्वर्गातून पृथ्वीकडे पाहिले.

१ )राष्ट्रे परमेश्वराच्या नावाला,
पृथ्वीवरचे सर्व राजे तुझ्या ऐश्वर्याला भितील; 
कारण परमेश्वराने सियोन पुन्हा बांधले आहे, 
तो आपल्या गौरवाने प्रकट झाला आहे. 
त्याने निराश्रितांच्या प्रार्थनेकडे लक्ष दिले आहे, 
त्यांची प्रार्थना त्याने तुच्छ मानली नाही. 

२) पुढच्या पिढीसाठी हे लिहून ठेवले जाईल; 
पुढे उत्पन्न होणारी प्रजा परमेश्वराचे स्तवन करील, 
कारण परमेश्वराने आपल्या उच्च पवित्रस्थानावरून खाली 
पाहिले; त्याने स्वर्गातून पृथ्वीकडे पाहून बंदिवानांचे उसासे ऐकले,
ज्यांचे मरण ठरले होते त्यांना सोडवले.

३) तुझ्या सेवकांचे वंशज कायम टिकून राहतील, 
त्यांची संतती तुझ्यासमोर स्थायिक होईल; 
ह्यासाठी की त्यांनी सियोनात 
परमेश्वराच्या नावाची घोषणा करावी 
आणि येरुशलेमात त्याची स्तुती गावी;
परमेश्वराची उपासना करावयास लोक 
आणि राज्ये एकत्र होतील तेव्हा असे होईल.

जयघोष 
आलेलुया, आलेलुया ! 
ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये विपुल राहो आणि 
त्याच्याद्वारे देव जो पिता त्याची उपकारस्तुती करा.
 आलेलुया!

शुभवर्तमान मार्क ८:२७-३३

वाचक :  मार्क लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

  "आपण ख्रिस्त आहा."

येशू आणि त्याचे शिष्य फिलिप्पीच्या कैसरियाच्या आसपासच्या खेड्यापाड्यांत जावयास निघाले, तेव्हा वाटेत त्याने आपल्या शिष्यांना विचारले, “लोक मला कोण म्हणून म्हणतात ?" त्यांनी त्याला उत्तर दिले, “बाप्तिस्मा करणारा योहान; कित्येक एलिया; कित्येक संदेष्ट्यांपैकी एक असे म्हणतात.” तेव्हा त्याने त्यांना विचारले, “पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता ?” पेत्रने त्याला उत्तर दिले, “आपण ख्रिस्त आहा.” तेव्हा माझ्याविषयी कोणाला सांगू नका अशी त्याने त्यांना ताकीद दिली.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


चिंतन:  पहिल्या वाचनात आपण पाहतो की, देव नोहाशी करार करत आहे. देव त्याला सांगतो की, यापुढे असा जलप्रलय पुन्हा कधीही येणार नाही व पृथ्वीचा नाश करणार नाही. देवाला सृष्टी आवडते. देव म्हणतो की, त्याने सर्व गोष्टी त्याच्या प्रतिमेनुसार आणि प्रतिरुपात बनवल्या आहेत. त्याने प्रेमातून जग निर्माण केले आहे. खरे तर देव लोकांना पापातून मुक्त होण्यासाठी प्रोत्साहन देतो. तो आपल्याला एकमेकांचा आदर करण्यास आणि एकमेकांबद्दल काळजी घेण्यास सांगत आहे. तो आपल्याला सृष्टीचे कारभारी होण्याचेही आमंत्रण देतो. आजच्या शुभवर्तमानात आपल्याला देव त्याच्या लोकांना कसे वाचवतो याची माहिती मिळते. येशू आपल्या शिष्यांना विचारत आहे की, मी कोण आहे असे तुम्ही म्हणता. पेत्र त्याला मसिहा म्हणतो, जो आपल्या लोकांना • वाचवेल. येशू स्पष्ट करतो की, तो तलवारीने किंवा हिंसाचाराने वाचवणार नाही. तो त्याच्या स्वतःच्या दुःख, उत्कटता, मृत्यू आणि पुनरुत्थान याच्याद्वारे वाचवेल. तो हे करेल कारण येशू हा राजकीय मसिहा नाही तर येशू एक दुःखसहन करणारा मसिहा आहे..

प्रार्थना : हे प्रभू येशू, मी तुला अंत:करणापासून जाणावे, तुझ्याशी एकरुप व्हावे आणि तुझी वचने कृतीत आणावीत म्हणून प्रेरणा व कृपा दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या