सामान्यकाळातील सहावा सप्ताह
बुधवार दि.१५ फेब्रुवारी २०२३
त्याच्या डोळ्यांवर पुन्हा हात ठेवले, तेव्हा त्याने निरखून पाहिले आणि तो बरा झाला
संत फॉस्टिनस व ज्योविता
- रक्तसाक्षी (... १२०)
फॉस्टिनस हे एक धर्मगुरू होते आणि त्याचा भाऊ एक उपधर्मगुरू (डिकन) होता. दोघेही प्रभावी व निर्भय वक्ते होते. देवाच्या पवित्र शब्दावर दोघांचाही गाढा व्यासंग होता. इटलीतील लोम्बार्डी प्रांतामधील ब्रेसिया येथे हे दोघेही ईश्वरसेवक जन्माला आले होते. दोघेही विलक्षण धैर्यवान होते. ट्राजन नावाच्या क्रूरकर्म्याच्या रक्तरंजित छळवादाच्या कारकीर्दीतही त्यांनी कोणाच्याही छळाची पर्वा न करता निसंकोचपणे ख्रिस्ताची सुवार्ता प्रज्वलित आणि जिवंत ठेवण्याचे अनमोल कार्य केले.
त्यांचे वाक्चातुर्य आणि कुशाग्र बुद्धिमत्ता पाहून विरोधकांना त्यांचा भयंकर द्वेष व मत्सर वाटू लागला. त्यांची धरपकड करून त्यांना कैदेत टाकण्यात आले. रोमी सम्राटाच्या दैवतांपुढे मान वाकविण्यासाठी त्यांना जबर आमिषे दाखविण्यात आली. परंतु या ईश्वरनिष्ठ बंधूंनी त्या आमिषांना बिलकूल भीक घातली नाही.
ते उमराव घराण्यातील असल्यामुळे आणि सर्वत्र प्रसिद्ध असल्यामुळे त्यांना कठोर शिक्षा करणे ट्राजन ह्यालाही कठीण वाटू लागले. त्याने त्यांना सम्राट हेड्रीयन ह्यांच्या हाती सोपविले. राज्यपाल ट्राजन मरून गेल्यानंतर तीन वर्षेपर्यंत सम्राट हेड्रियन याने दोघांची मने वळविण्यासाठी धर्मपंडितांच्या अनेक सभा आणि वादविवाद स्पर्धा भरविल्या. परंतु दोघांच्या ज्ञान सागरासमोर इतरांचे मेंदू डबक्यातील गढूळ पाण्यासारखे भासले. शेवटी आपली डाळ काही शिजत नाही ह्याची पुरेपूर खात्री पटल्यानंतर दोघांचा तरवारीने शिरच्छेद करण्यात आला.
संत फॉस्टीनस आणि संत ज्योविता हे ब्रेसिया शहराचे मुख्य आश्रयदाते मानले जातात. त्यांची नावे आश्रयदात्यांच्या व रक्तसाक्षी संतांच्या बऱ्याच यादयात सांपडतात.
✝️
पहिले वाचन उत्पत्ती ८:६-१३.२०-२२
वाचक :उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन
"नोहाने तारवाचे छप्पर काढून पाहिले आणि पृथ्वीचा पृष्ठभाग वाळला आहे असे त्याला दिसले. "
चाळीस दिवस लोटल्यावर नोहाने तारवाला जी खिडकी केली होती ती त्याने उघडली आणि एक कावळा बाहेर सोडला, तो पृथ्वीवरील पाणी सुकेपर्यंत इकडेतिकडे फिरत राहिला. पाणी भूपृष्ठावरून आटले किंवा नाही हे पाहण्यासाठी त्याने एक कबूतर बाहेर सोडले. त्या कबुतराला पाय टेकण्यास कोठे आधार न मिळाल्यामुळे ते त्याच्याकडे तारवापाशी परत आले. कारण सगळ्या पृथ्वीच्या पाठीवर अद्यापि पाणी होते. तेव्हा नोहाने हात बाहेर काढून त्याला धरून आपल्याकडे तारवात घेतले. त्याने आणखी सात दिवस वाट पाहून तारवातून त्या कबुतराला पुन्हा बाहेर सोडले. सायंकाळी ते कबूतर त्याच्याकडे आले, तो त्याच्या चोचीत जैतून झाडाचे नुकतेच खुडलेले पान आहे असे त्याला दिसले. नोहा त्यावरून समजला की आता पृथ्वीवरचे पाणी आटले आहे. त्याने आणखी सात दिवस थांबून त्या कबुतराला पुन्हा सोडले, ते त्याच्याकडे पुनरपि परत आले नाही. सहाशेएकाव्या वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पृथ्वीवरचे पाणी सुकून गेले तेव्हा नोहाने तारवाचे छप्पर काढून पाहिले तो पृथ्वीचा पृष्ठभाग वाळला आहे असे त्याला दिसले.
नंतर नोहाने परमेश्वरासाठी वेदी बांधली आणि सर्व शुद्ध पशू आणि सर्व शुद्ध पक्षी यांतले काही घेऊन त्या वेदीवर त्याचे होमार्पण केले. परमेश्वर त्याचा सुवास घेऊन आपल्या मनात म्हणाला, “मानवामुळे मी यापुढे भूमीला कधीही शाप देणार नाही, कारण मानवाच्या मनातल्या कल्पना बाळपणापासून दुष्ट असतात. तर मी आताच्याप्रमाणे पुन्हा अखिल जिवांचा कधीही संहार करणार नाही. पृथ्वी राहील तोपर्यंत पेरणी आणि कापणी, थंडी आणि ऊन, उन्हाळा आणि हिवाळा, दिवस आणि रात्र ही व्हावयाची राहणार नाहीत."
हा प्रभूचा शब्द
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ११६:१२-१३, १४-१५,१८-१९
प्रतिसाद : हे परमेश्वरा, मी तुला उपकारस्तुतीचा यज्ञ करीन.
१. परमेश्वराने माझ्यावर केलेल्या सर्व उपकारांबद्दल
मी त्याचा कसा उतराई होऊ ?
मी तारणाचा प्याला हाती घेऊन
परमेश्वराच्या नावाचा धावा करीन.
२. परमेश्वराला केलेले नवस मी त्याच्या
सर्व लोकांसमक्ष फेडीन.
परमेश्वराच्या दृष्टीने त्याच्या भक्तांचे मरण अमोल आहे.
३. परमेश्वराला केलेले
नवस मी त्याच्या सर्व लोकांसमक्ष फेडीन.
परमेश्वराच्या घराच्या अंगणात,
हे येरुशलेम, तुझ्यामध्ये मी ते फेडीन.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा पिता हा आमचे अंतश्चक्षू प्रकाशित करो; म्हणजे त्यामुळे त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती ही तुम्ही ओळखून घ्यावी.
आलेलुया!
वाचक : मार्क लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तो आधंळा मनुष्य बरा झाला आणि सर्व काहीत्याला स्पष्ट दिसू लागले. "
येशू आणि त्याचे शिष्य हे बेथसैदा येथे आले. तेव्हा लोकांनी येशूकडे आंधळ्याला आणले आणि आपण त्याला स्पर्श करावा अशी त्याला विनंती केली. तेव्हा त्याने त्या आंधळ्याचा हात धरून त्याला गावाबाहेर नेले आणि त्याच्या डोळ्यांवर थुंकून आणि त्याच्यावर हात ठेवून त्याला विचारले, “तुला काही दिसते काय ?" तो वर पाहून म्हणाला, "मला माणसे दिसत आहेत असे वाटते कारण ती मला झाडांसारखी दिसत आहेत, तरी पण ती चालत आहेत.” नंतर त्याने त्याच्या डोळ्यांवर पुन्हा हात ठेवले, तेव्हा त्याने निरखून पाहिले आणि तो बरा झाला आणि सर्व काही त्याला स्पष्ट दिसू लागले. मग त्याला त्याच्या घरी पाठवताना येशूने सांगितले, “ह्या गावात पाऊलसुद्धा टाकू नकोस."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: आंधळ्या मनुष्याला स्पर्श केल्यावर, येशूने त्याला विचारले की, “तुला काही दिसत आहे का ?" त्याने उत्तर दिले की, स्पष्टपणे काही दिसत नाही; परंतु त्याला झाडांसारखे दिसणारे लोक दिसत आहेत. त्याची दृष्टी अस्पष्ट होती, म्हणून येशूने त्याला दुसऱ्यांदा स्पर्श केला तेव्हा तो स्पष्टपणे सर्वकाही पाहू शकला. उत्पत्तीच्या पुस्तकातील आजच्या पहिल्या वाचनात आपल्याला नोहा पुराचे पाणी कमी झाले आहे की नाही हे पाहताना आढळतो. पहिल्यांदा पाहिल्यावर त्याला व्यवस्थित अंदाज येत नाही. तरीही नंतर जेव्हा तो पुन्हा किती पाणी आहे हे बघतो तेव्हा तो स्पष्टपणे अंदाज बांधतो. पवित्र ख्रिस्तशरीरामध्ये आपण येशूला भेटतो. आपल्या प्रार्थनेच्या वेळीही आपण येशू बरोबर संवाद साधत असतो. आपल्या जीवनातील दैनंदिन घडामोडींमध्ये आपण येशूला स्पष्टपणे पाहू शकतो की नाही हा प्रश्न आपण स्वतःसमोर ठेवला पाहिजे. आपल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणी देव आपल्यासाठी किती परिश्रम करत आहे हे आपण ओळखू शकतो का ? आपण आपल्या दैनंदिन जीवनात देवाचा चांगुलपणा ओळखण्यात अयशस्वी झालो आहोत. तरीही, ज्याप्रमाणे आंधळा मनुष्य सुरूवातीला स्पष्टपणे पाहू शकत नव्हता परंतु नंतर तो स्पष्टपणे पाहू शकला. आम्हालाही आमच्या जीवनात देवाचे चमत्कार पाहण्यासाठी आमंत्रित केले आहे.
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझी दया व करुणा अपार आहे. आम्हाला स्पर्श कर व आमची श्रद्धा बळकट कर, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या