Marathi Bible Reading | Monday 20th February 2023 | 7th Week in Ordinary Time |

सामान्यकाळातील सातवा  सप्ताह

सोमवार  दि.२० फेब्रुवारी  २०२३

 आपल्या हातून बरे काही होणे शक्य असेल तर आम्हावर दया करा आणि आम्हाला साहाय्य करा.” 

✝️




 संत युखेरिअस

प्रत्येक पाप देवावरील द्वेष व्यक्त करीत असल्यामुळे त्यामध्ये दैवी प्रकाश आढळणे कधीतरी शक्य आहे काय? - संत युखेरिअस

✝️

 देवावरील श्रद्धा आणि निष्ठा सर्व प्रकारच्या स्थितीत आपल्याला दिलासा देते. मात्र प्रभू येशू म्हणत आहे त्याप्रमाणे, 'प्रार्थनेवाचून सर्व अशक्य आहे.' विश्वास, प्रार्थना आणि प्रर्थनेला कृतीची जोड असायलाच हवी.
विश्वासाची खरी उभारणी देवाने प्रार्थना, शरणागती व उपवासाच्या  सामर्थ्यावरील पायावर केलेली आहे. जितका हा पाया मजबूत असेल तितकेच जीवन सुसह्य व सुखकर होत असते. आपण आज आपली प्रार्थना, श्रद्धा व आचरण ह्यावर चिंतन करु या. देवाच्या वचनांवर अवलंबून राहण्यासाठी प्रयत्नशील बनू या.
 ✝️   

पहिले वाचन बेन सिरा  १:१-१०
वाचक : बेन सिरा या पुस्तकातून घेतलेले वाचन १:१-१०

"सर्वप्रथम ज्ञान निर्माण करण्यात आले."

सर्व ज्ञान प्रभूकडून येते आणि ते सदासर्वकाळ त्याच्याचजवळ आहे. समुद्रकाठच्या रेतीचे कण, पावसाचे थेंब आणि अनंतकाळापासूनचे दिवस कसे बरे मोजू शकतो ?
आकाशाची उंची, पृथ्वीचा विस्तार आणि ज्ञानाची खोली कोण शोधू शकेल ? सर्वप्रथम ज्ञान निर्माण करण्यात आले आणि अनादिकाळापासून विवेकपूर्ण ज्ञानाचे अस्तित्व आहे.
ज्ञानाचे मूळ कोणाला बरे दाखवण्यात आले आहे ? आणि ज्ञानाचे विचार कोण बरे जाणतो? फक्त एकच केवळ ज्ञानी आहे, तो आपल्या सिंहासनावर आरूढ आहे, त्याचेच आपण भय धरावे.
परमेश्वराने ज्ञान निर्माण केले, त्याने ज्ञानास न्याहाळले, अनुभवले आणि आपल्या कार्यात ज्ञानास सामावून घेतले. परमेश्वराच्या देणगीनुसार ज्ञान संपूर्ण शरीरात वास्तव्य करते. जे त्याच्यावर प्रेम करतात त्यांना त्याने ज्ञानाचे वरदान दिले आहे.
हा प्रभूचा शब्द 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ९३:१-२,५
प्रतिसाद :   परमेश्वर राज्य करतो.

१) परमेश्वर राज्य करतो,
त्याने ऐश्वर्याचा पेहराव घातला आहे.
परमेश्वराने सामर्थ्याचा पेहराव घालून कंबर कसली आहे. 

२) पृथ्वी स्थिर आहे, डळमळत नाही;
तुझे राजासन पुरातन काळापासून स्थिर आहे. 
तू अनादिकाळापासून आहेस.

३) खरोखर तुझे निर्बंध अभंग आहेत. 
हे परमेश्वरा, तुझ्या घराला पावित्र्य सदैव शोभते.


जयघोष 
आलेलुया, आलेलुया ! 
हे माझ्या प्रभो, तुझे मार्ग मला दाखव, 
तुझ्या सत्याला अनुसरून वागायला मला शिकव.
 आलेलुया!

शुभवर्तमान मार्क ९:१४-२९

वाचक :  मार्क लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

 "हे प्रभो, माझा विश्वास आहे, माझा अविश्वास घालवून टाक."

जेव्हा येशू, पेत्र, याकोब आणि योहान यांच्यासमवेत शिष्यांजवळ आला तेव्हा त्यांच्याभोवती लोकसमुदाय आहे आणि त्यांच्याबरोबर शास्त्री वादविवाद करीत आहेत असे त्यांना दिसून आले. येशूला पाहताच सर्व लोक अगदी आश्चर्यचकित झाले आणि त्याच्याकडे धावत जाऊन त्यांनी त्याला प्रणाम केला. त्याने त्यांना विचारले, “ह्यांच्याशी तुमचा कसला वादविवाद चालला आहे ?” तेव्हा समुदायातील एकाने उत्तर दिले, “गुरुजी, मी माझ्या मुलाला आपल्याकडे घेऊन आलो, ह्याला मुका आत्मा लागला आहे. तो जेथे जेथे ह्याला धरतो तेथे तेथे तो त्याला खाली आपटतो, मग हा तोंडाला फेस आणून कडकडा दात खातो आणि निपचित पडतो. त्याला बरे करावे म्हणून आपल्या शिष्यांना मी सांगितले, परंतु त्यांना तो बरे करता येईना." ह्यावर तो म्हणाला, “हे विश्वासहीन पिढी, मी कोठवर तुमच्याबरोबर राहू ? कोठवर तुम्हाला वागवून घेऊ? त्याला माझ्याकडे आणा." त्यांनी त्याला त्याच्याजवळ आणले, तेव्हा त्या आत्म्याने येशूला पाहताच त्या मुलाला पिळून टाकले आणि तो मुलगा जमिनीवर पडून तोंडाला फेस आणून लोळू लागला. तेव्हा त्याने त्याच्या बापाला विचारले, “ह्याला असे होऊन किती काळ लोटला ?” तो म्हणाला, “बाळपणापासून. ह्याचा नाश करावा म्हणून त्याने ह्याला पुष्कळदा विस्तवात आणि पाण्यात टाकले, आपल्या हातून बरे काही होणे शक्य असेल तर आम्हावर दया करा आणि आम्हाला साहाय्य करा.” येशू त्याला म्हणाला, “शक्य असेल तर असे कसे म्हणतोस ? विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे.' लगेच मुलाचा बाप मोठ्याने म्हणाला, “माझा विश्वास आहे, माझा अविश्वास घालवून टाका!” तेव्हा लोक धावत येत आहेत असे पाहून येशू अशुद्ध आत्म्याला धमकावून म्हणाला, “अरे मुक्याबहिऱ्या आत्म्या, मी तुला आज्ञा करतो, ह्याच्यातून नीघ आणि पुन्हा कधी ह्याच्यात शिरू नको." तेव्हा तो आत्मा ओरडून आणि त्याला फारच पिळून निघाला आणि तो मुलगा मेल्यासारखा झाला. “तो मेला आहे." असेच बहुतेक म्हणाले, पण येशूने त्याला हाताला धरून उठवले आणि तो उभा राहिला. मग तो घरात गेल्यावर त्याच्या शिष्यांनी त्याला एकांती विचारले, “आम्हाला तो का काढता आला नाही?” येशू त्यांना म्हणाला, “ही जात प्रार्थनेवाचून दुसऱ्या कशानेही निघणार नाही. "

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


चिंतन:आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण ऐकतो की, येशूचे शिष्य आणि परुशी यांच्यात वाद झाला. येशूला पाहून शिष्य घाबरले. ही भीती येशूप्रती आदराची होती कारण त्यांच्या उपस्थितीत कोणीतरी असाधारण आहे हे त्यांना माहीत होते. पहिल्या वाचनातही परमेश्वराच्या भीतीचे हे  वैशिष्ट्ये ठळकपणे दिसून येते. परमेश्वराचे हे भयच मानवी हृदयाला आनंदाने भरून टाकते. जे त्याचा आदर करतात त्यांना तो आनंद देतो. ज्या माणसाच्या मुलाला अशुद्ध आत्म्याने ग्रासले होते त्याने येशूला विचारले की, “जर शक्य असेल तर माझ्या मुलाला बरे कर.”ज्याला येशू उत्तर देतो की, “जर हे शक्य असेल तर तुम्ही विश्वास ठेवा.” येशू त्याला देवाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवण्यास सांगतो. “शक्य असेल तर” असे म्हणणे त्याच्या बाजूने चुकीचे आहे कारण ते त्याच्यामध्ये संशयाची भावना दर्शवते. एखाद्या व्यक्तीमध्ये ईश्वराचे भय तेव्हाच शक्य आहे जेव्हा त्याचा देवावर दृढ विश्वास असतो. जेव्हा या आदरयुक्त भीतीसोबत देवावर दृढ विश्वास असतो तेव्हा ते आपल्या जीवनात चमत्कार घडवून आणते. शुभवर्तमानात, येशू आपल्याला सांगतो की, ही आदरयुक्त भीती आणि देवावर दृढ विश्वास केवळ प्रार्थना आणि उपवासाद्वारेच शक्य आहे. प्रार्थना आणि उपवास हे असे साधन आहेत ज्याद्वारे आपला देवावरील विश्वास दृढ होतो.

प्रार्थना :  हे प्रभू येशू, तुला शरण येऊन सर्वस्व समर्पण करण्यास तसेच | विश्वासाने जीवन जगण्यास प्रेरणा व कृपा दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या