वाचक : मार्क लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"मनुष्यांचा पुत्र माणसांच्या हाती दिला जाणार आहे. जर कोणी पहिला होऊ इच्छित असेल तर त्याने सर्वात शेवटला झाले पाहिजे."
येशू आणि त्याचे शिष्य गालिलमधून चालले होते आणि हे कोणाला कळू नये, अशी त्याची इच्छा होती. कारण तो आपल्या शिष्यांना शिकवत होता; “मनुष्याचा पुत्र माणसांच्या हाती दिला जाणार आहे, ते त्याला जिवे मारतील आणि मारला गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठेल.” परंतु ह्या बोलण्याचा अर्थ त्यांना समजला नाही आणि त्याला विचारण्यास ते भ्याले.
पुढे ते कफर्णहूमला आले आणि तो घरी असता त्याने त्यांना विचारले, "तुम्ही वाटेत कसली चर्चा करीत होता ?” ते गप्प राहिले, कारण सर्वांत मोठा कोण ह्याविषयी त्यांची वाटेत चर्चा चालली होती. त्याने बसून त्या बारा जणांना बोलावून म्हटले, "जर कोण पहिला होऊ इच्छित असेल तर त्याने सर्वात शेवटला आणि सर्वांचा सेवक झाले पाहिजे.” मग त्याने एक बालक घेऊन त्यांच्यामध्ये ठेवले आणि त्याला कवटाळून तो त्यांना म्हणाला, "जो कोणी माझ्या नावाने अशा बालकांपैकी एकाला स्वीकारतो, तो मला स्वीकारतो आणि जो कोणी मला स्वीकारतो तो मला नाही तर ज्याने मला पाठवले त्याला स्वीकारतो.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन:आजच्या शुभवर्तमानामध्ये येशू त्याच्या मृत्यू आणि पुनरुत्थानाबद्दल भाकित करतो. येणाऱ्या दुःखांबद्दल येशू त्यांच्याशी काय बोलत होता है। समजणे शिष्यांना कठीण गेले. दुसरीकडे त्यांना देवाच्या राज्यात सर्वांत मोठा कोण असेल याची चिंता होती. येशू शिष्यांना सांगतो की, जो स्वतः सेवक बनू पाहतो व जो स्वतःला लहान करू पाहतो तोच महान होईल. आजच्या पहिल्या वाचनात आपण सर्व दुःख सहन करण्याबाबत ऐकतो. आपण विविधप्रकारचे दुःख सहन करू शकतो, तेव्हाच आपण वाढू शकतो आणि महान होऊ शकतो. सोन्याची परीक्षा अग्नीत होते तशी प्रामाणिक माणसाची परीक्षा संकटात होते. जीवनातील कठीण प्रसंगामध्ये धीर आणि संयम बाळगल्यामुळे संकटे सहजपणे दूर होतात व मानवाला जीवनाचा खरा अर्थ कळतो. जीवनातील विविध संकटे सहन करण्यास सक्षम होण्यासाठी सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे आपण देवावर ठेवलेला विश्वास. तोच विश्वास एखाद्या व्यक्तीला देवाच्या जवळ जाण्यासाठी सक्षम करील. येशूला सर्वप्रकारचे दुःख नम्रतेने व धीराने सहन करता आले. देवाच्या प्रेमात वाढ होण्यासाठी आपण संयम आणि सहनशीलतेच्या देणगीसाठी देवाकडे प्रार्थना करूया.
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्यासारखे नम्र हृदय मजला लाभावे म्हणून माझ्यातील अहंकार व गर्विष्ठपणा काढून टाक आणि माझे जीवन परिवर्तन कर, आमेन
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
0 टिप्पण्या