उपवासकाळाला सुरवात
राखेचा बुधवार
दि.२२ फेब्रुवारी २०२३
✝️
"तू तर उपवास करतो तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव व आपले तोंड धू. तू उपवास करीत आहेस हे लोकांना नव्हे तर तुझ्या गुप्तवासी पित्याला दिसावे,"
✝️
आज राखेचा बुधवार,
आजपासून ४०/५० दिवसपर्यंत आपण उपवास काळात (प्रायश्चित) प्रवेश करीत आहोत. इस्त्राएली जनतेने चाळीस वर्षाची अरण्यातील वाटचाल करुन बाहेर निघाल्याचे प्रतिकात्मक दर्शक म्हणून हे चाळीस दिवस आहेत. निनवेकरांना पश्चाताप करायला लावणाऱ्या योना संदेष्ट्याने दिलेल्या ४० दिवसाच्या संधीचे पण हे प्रतिकत्मक दर्शक आहे.
योएल संदेष्टया सियोनवासीयांना पश्चात्तापाचा संदेश देताना परमेश्नराचे वचन सांगत आहे.
प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा ४० दिवस उपवास करुनच देवराज्याची घोषणा केली.
योनाचे उद्दिष्ट निनवेकरांचे परिवर्तन व्हावे हे होते. तर प्रभू येशू ख्रिस्ताला देवराज्याची स्थापना करायची होती. तशाच प्रकारे हे चाळीस दिवस ख्रिस्तसभा आपल्या प्रत्येकाला परिवर्तनाबरोबर प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थान सहभागी होण्याकरिता तयारी करण्यासाठी देत आहे.
संत पौल आजच्या दुसऱ्या वाचनात ह्या अनुकुलसमयी आपण सर्वांबरोबर व देवाबरोबर समेट करावा म्हणून बोध करीत आहे.
आज आपल्या कपाळावर राख लावून आपल्या प्रत्येकाला पश्चात्तापासाठी आवाहन करण्यात येत आहे. आपल्या पापी जीवनाचा आढावा घेऊन पश्चात्तापी अंत करणाने प्रभू भोजनात सहभागी होऊ या. आपल्या ह्या आध्यात्मिक प्रवासात असताना प्रभूकडे दयेची याचना करू या.
✝️
पहिले वाचन योएल २:१२-१८
वाचक : योएल या पुस्तकातून घेतलेले वाचन
लोकहो, आता तरी परमेश्वराचे वचन ऐका: “मन:पूर्वक माझ्याकडे वळा. उपोषण, आक्रंदन व शोक करून वळा. आपली वस्त्रे नव्हे, तर आपली हृदये फाडा आणि परमेश्वर तुमचा देव याच्याकडे वळा, कारण तो कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध, दयासागर आहे. अरिष्ट आणल्याबद्दल त्याला वाईट वाटते. परमेश्वर तुमचा देव याला कळवळा येऊन तो मागे वळेल व आपणामागे आशीर्वाद ठेवून जाईल. त्याद्वारे तुम्हांला त्याला अन्नापर्ण व पेयार्पण करता येईल.
सियोनत कर्णा वाजवा. उपवासाचा एक पवित्र दिवस नेमा. पवित्र मेळा भरवा. लोकांना जमवा. मंडळी शुद्ध करा. वडिलांना जमवा. मुले, स्तनपान करणारी अर्भके यांनाही एकत्र करा. वर आपल्या खोलीतून व वधू आपल्या मंडपातून बाहेर येवोत. देवडी व वेदी यांच्यामध्ये याजक, परमेश्वराचे सेवक, रुदन करीत म्हणोत, "हे परमेश्वरा, आपल्या लोकांवर करुणा कर, आपल्या वतनाची अप्रतिष्ठा होऊ देऊ नकोस. होऊ देशील तर राष्ट्रे त्याची निर्भर्त्सना करतील. त्यांचा देव आता कोठे गेला असे राष्ट्रांनी का म्हणावे ?"
तेव्हा परमेश्वराने आपल्या देशाविषयी ईर्ष्या धरली. तो आपल्या लोकांविषयी कळवळला.
प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ५१:३-६, १२ - १४,१७
प्रतिसाद : हे प्रभो, आम्हांवर दया कर, कारण आम्ही पाप केले आहे.
१) हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून
माझ्यावर कृपा कर. तू आपल्या विपुल
करुणेने अनुसरून माझे अपराध पुसून टाक.
माझे पाप दूर करून मला स्वच्छ कर.
२) मी आपले अपराध जाणून आहे.
माझे पाप माझ्यापुढे नित्य आहे.
तुझ्याविरुद्ध मी पाप केले आहे.
तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे.
३) हे देवा, माझ्याठायी शुद्ध हृदय उत्पन्न कर.
माझ्याठायी स्थिर असा आत्मा पुन्हा घाल.
तू मला आपणापुढून घालवून देऊ नकोस आणि
आपला पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नकोस.
४) तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे.
आणि उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून धर.
प्रभो, माझे ओठ उघड,
म्हणजे मी तुझी कीर्ती गाईन.
दुसरे वाचन २ करिंथ ५:२०,६:२
वाचक : पौलचे करिंथकरांस दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन
बंधूजनहो, आम्ही देवाचे प्रतिनिधी आहो, देव आम्हांद्वारे विनंती करीत आहे. देवाबरोबर समेट करा, अशी आम्ही ख्रिस्ताच्या वतीने विनंती करतो. यासाठी ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुम्हाआम्हांकरिता पाप असे केले. यासाठी की, आम्ही त्याच्या ठायी देवाचे नीतितत्व असे व्हावे. आम्ही त्याच्यासह कार्य करीत असता विनंती करतो की, तुम्ही देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नये, तो म्हणतो : “अनुकूलसमयी मी तुझे ऐकले व तारणाच्या दिवशी मी तुला साहाय्य केले." पाहा, आताच समय अनुकूल आहे. आजच तारणाचा दिवस आहे.
प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
जयघोष
हे देवा, “माझ्याठायी शुद्ध हृदय उत्पन्न कर आणि तुझ्या उद्धाराचा आनंद मला दे."
शुभवर्तमान मत्तय ६:१-६,१६-१८
वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
माणसांनी पाहावे या हेतूने तुम्ही आपले धर्माचरण त्यांच्यासमोर न करण्याविषयी जपा. केले तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ तुम्हाला प्रतिफळ नाही. यास्तव जेव्हा जेव्हा तू दानधर्म करतोस तेव्हा तेव्हा लोकांनी आपला गौरव करावा म्हणून, ढोंगी जसजसे सभास्थानात व रस्त्यात आपणापुढे शिंग वाजवतात तसे करू नकोस. मी तुम्हांला सत्य सांगतो की, त्यांना त्याचे प्रतिफळ मिळाले आहे. तू तर दानधर्म करतोस तेव्हा तुझा उजवा हात काय करतो हे तुझ्या डाव्या हाताला कळू नये. तुझा दानधर्म गुप्तपणे व्हावा म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तुझे फळ देईल. तसेच जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तेव्हा ढोंग्यासारखे असू नका. कारण लोकांनी आपल्याला पाहावे म्हणून सभास्थानात व चव्हाट्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यांना आवडते. मी तुम्हांला नक्की सांगतो की, त्यांना त्याचे प्रतिफळ मिळाले आहे. तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस, तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला त्याचे फळ देईल. तुम्ही जेव्हा उपवास करता तेव्हा ढोंग्यासारखे म्लानमुख होऊ नका. कारण आपण उपवास करीत आहो असे लोकांना दिसावे म्हणून ते आपले तोंड विद्रूप करतात. मी तुम्हांला नक्की सांगतो की, त्यांना त्याचे प्रतिफळ मिळाले आहे. तू तर उपवास करतो तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव व आपले तोंड धू. तू उपवास करीत आहेस हे लोकांना नव्हे तर तुझ्या गुप्तवासी पित्याला दिसावे, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: ख्रिस्ती उपासना वर्षातील ५२ पैकी तब्बल १३ आठवडे ख्रिस्तसभा प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखसहन, मरण व पुनरुत्थानावर चिंतन करण्यात घालवीत असते. प्रायश्चित्त काळातील सहा आठवडे हे आपल्या पृथ्वीतलावरील जीवनाचे तर पुनरुत्थान काळातील सात आठवडे हे स्वर्गीय जीवनाचे प्रतिक होत. पृथ्वीवरील जीवन हे नश्वर असून माणूस आपल्या दुर्बलतेपायी सतत पापात पडतो व गुलामगिरीचे जीवन जगतो. ह्या संघर्षाच्या काळात त्याने मनापासून पश्चात्ताप करून जर आपले मार्ग बदलले तर त्याला स्वर्गीय सुखाचा अनुभव या पृथ्वीवरच येऊ शकतो. १. मानवी जीवनाची क्षणभंगुरता : थंडगार पाण्यासाठी ऊन्हाळ्यात माठासमोर लोकांनी भली मोठी रांग लावलेली होती म्हणून कोणीतरी त्या माठाला विचारले, “तुला थोडाफार गर्व वाटत नाही का ? त्या माठाने किती सुंदर उत्तर दिले, “ज्याचा भूतकाळ मातीचा आहे, ज्याचा वर्तमानकाळ मातीचा आहे आणि ज्याचा भविष्यकाळ देखील मातीचा आहे त्याला गर्व कसला?” माणसाचे जीवनही तसेच आहे. ह्याची जाणीव करून देण्यासाठी ख्रिस्तसभा आज भाविकांच्या कपाळाला राख लावीत म्हणते, “मानवा, तू माती आहेस आणि मातीला मिळशील.”
२. मातीच्या मडक्यात स्वर्गीय संपत्ती : आपले शरीर हे जरी मातीचे मडके असले तरी त्यात परमेश्वराचा श्वास असलेला पवित्र आत्मा ही स्वर्गीय संपत्ती साठविण्यात आलेली आहे. “पात्र असो, मातीचे वा लाकडाचे, वेड मजला आतल्या अमृताचे” ह्या उक्तीनुसार आपल्या नश्वरतेबरोबरच आपल्यामध्ये असलेल्या ईश्वरी अंशाची जाणीव ह्या प्रायश्चित्तकाळात आपल्याला करून दिली जाते.
३. आंतरिक संघर्ष : एकीकडे ईश्वराविषयीची ओढ व उत्कंठा तर दुसरीकडे मानवी दुर्बळतेमुळे जागतिक गोष्टीविषयी वाटणारे आकर्षण असा आंतरिक संघर्ष माणसाच्या जीवनात सुरू असतो. त्याची पुरेशी जाणीव नसली तर शीड फाटलेल्या जहाजासारखी व दोरी तुटलेल्या पतंगासारखी माणसाची गत होऊ शकते. केवळ जाणीवदेखील पुरेशी नसते. त्यासाठी एक आध्यात्मिक साधना हाती घ्यावी लागते.
४. आध्यात्मिक साधना : कपाळाला राख लावीत धर्मगुरू म्हणतात, “पश्चात्ताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा.” पश्चात्ताप करायचा म्हणजे पापी जीवन शैलीपासून माघारी वळायचे. सुवार्तेवर विश्वास ठेवायचा म्हणजे ह्या पापी जीवनातून आपण मुक्त होऊन नवीन जीवन सुरू करू शकतो. एक वेगळे विश्व शक्य आहे यावर भरवसा ठेवायचा. त्यासाठी प्रार्थना, उपवास आणि दानधर्म ही त्रिसूत्री आध्यात्मिक साधना म्हणून आपल्याला सुचविण्यात आलेली आहे.
आत्मपरीक्षण : ह्या प्रायश्चित्तकाळात मी कोणती आध्यात्मिक साधना हाती घेणार आहे ? त्याद्वारे मला माझ्या जीवनात कोणकोणत्या प्रकारचा बदल करायचा आहे?
प्रार्थना : हे प्रभू परमेश्वर, माझ्यासाठी शुद्ध अंत:करण निर्माण कर माझ्यावर दया कर आणि माझ्या जीवनाचा परिवर्तन कर.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या