Marathi Bible Reading | 23rd February 2023 | Thursday After Ash Wednsday

उपवासकाळाला सुरवात 

गुरुवार 

 दि.२३ फेब्रुवारी  २०२३

✝️ 

जर कोणा एका मनुष्याने सगळे जग मिळवले आणि स्वत:ला गमावले किंवा स्वतःचा नाश करुन घेतला तर त्याला काय लाभ ?"



✝️

संत पॉलीकार्प

- (५९-१५५)

शुभवर्तमानकार संत योहान (सण २७ डिसें.) ह्याने पॉलीकार्प ह्याला ख्रिस्ती धर्माविषयी सुवार्ता सांगितली आणि त्याला पूर्ण धर्मशिक्षण देऊन त्याने ख्रिस्ती धर्माची दीक्षा दिली. पुढे संत योहान पात्म नावाच्या बेटावर बंदिस्त अवस्थेत होता. परंतु तिथे जाण्याअगोदर ३७ वर्षीय पॉलीकार्प ह्याला त्याने स्मर्णा . येथल्या ख्रिस्तमंडळीचा प्रमुख (बिशप) नेमले. यहुदयांनी सतत त्यांचा छळ केला आणि त्यांच्या वाट्याला अठरा विश्वे दारिद्र्य आले. तरीही बिशप पॉलीकार्प ह्यांनी आपली ख्रिस्ती श्रद्धा अढळ राखली व ते पवित्र जीवन जगत राहिले.
इ. स. १५५ साली वयाच्या ९६ व्या वर्षी इस्टर ह्या सणाची निश्चित तारीख ठरविण्यासाठी ते रोम येथे जाऊन पोप ॲनिसेटस् ह्यांना भेटले. त्यांच्या भेटीने हा वादग्रस्त प्रश्न सुटला नसला तरी पौर्वात्य परंपरेनुसार त्यांना निसान ह्या यहुदी महिन्याच्या १४ तारखेला (मग तो रविवार असो वा नसो) प्रभूचे पुनरुत्थान साजरे करण्याची परवानगी पोप महाशयांनी दिली.
पोपमहाशयांची भेट आटोपून बिशप पॉलीकार्प आपल्या स्मर्णा येथील धर्मप्रांतात परततात तोच ख्रिस्ती लोकांचा भयंकर छळ सुरू झाला. लोकांच्या आग्रहाखातर त्यांना शहराच्या सीमेवरच एका गुप्तस्थळी हलविण्यात आले. परंतु शिक्षेच्या भीतीपोटी एका गुलामाने शेवटी हे गुपित उघड केले. बिशपांना राज्यपालाच्या न्यायदरबारात आणण्यात आले आणि त्यांनी ख्रिस्ताचा धिक्कार करावा म्हणून त्यांच्यावर दडपण आणले गेले. परंतु त्यावेळी ते अगदी खंबीरपणे म्हणाले, “माझ्या आयुष्याची ९६ वर्षे मी ज्या प्रभूची सेवा केली आहे त्या माझ्या उद्धारकाला व राजाला मी काही क्षणातच धिक्कारू शकेन काय?”
त्यांचे ते निर्भीडपणाचे उत्तर ऐकून राज्यपाल संतापला. त्यांचे हात पाठीवर बांधण्यात आले आणि त्याला जिवंत जाळण्यासाठी खुल्या मैदानावर आणण्यात आले. त्यावेळी ते पवित्र त्रैक्याची स्तुती गौरव करीत होते. ख्रिस्ताच्या दुःखाचा प्याला पिण्यासाठी देवाने आपली निवड केली म्हणून ते देवाला धन्यवाद देत होते. त्यांची प्रार्थना सुरू असतानाच त्यांच्या भोवती चिता रचण्यात आली. त्यांचा “आमेन" हा शब्द ऐकताच चिता पेटविण्यात आली. सर्व लाकडे जळून खाक झाली तरी बिशप पॉलीकार्प ह्यांच्या शरीराला अग्नीचा थोडासादेखील स्पर्श झालेला नव्हता. शेवटी अपमानीत झालेल्या राज्यपालाने सूडभावनेने त्यांच्या शरीरात भाला भोसकला व त्यांना ठार मारले.
"संत पॉलीकार्पची कृत्ये” ह्या परिपत्रात बिशप पॉलीकार्प ह्याचे रक्तसाक्षीत्व वर्णन करण्यात आलेले आहे. ख्रिस्ती परंपरेने हे पत्र जतन करून ठेवलेले आहे. तसेच तत्कालीन ख्रिस्तसभेतील जगभरच्या ख्रिस्तमंडळ्यांना छळास तोंड देता यावे म्हणून आपल्या पवित्र महागुरूचे रक्तसाक्षी मरणाचे वर्णन करणारे हे पत्र सर्वत्र प्रसारित करण्यात आले. ख्रिस्ती रक्तसाक्ष्यांच्या यादीतील हा सर्वात प्राचीन पुरावा आहे. यावरून त्याही अवस्थेत ख्रिस्तसभा आपल्या रक्तसाक्ष्यांची माहिती व अवशेष जतन करून ठेवीत असे ह्याला आधार मिळतो.
कानाच्या आजारासाठी संत पॉलीकार्प ह्यांचा धावा केला जातो.

चिंतन : आपल्या हौतात्म्यावेळी बिशप पॉलीकार्प ह्यांनी पुढीलप्रमाणे प्रार्थनाकेली : हे प्रभो, ह्या दिवसाच्या आणि क्षणाच्या भेटीबद्दल रक्तंसाक्ष्यांच्या संगतीत मी ख्रिस्ताच्या एकाच प्याल्यात सहभागी व्हावे, तुझा अभिषिक्त म्हणून गौरविले जावे, आत्म्याने व शरीराने पुन्हा उठविले जावे आणि पवित्र आत्म्याद्वारे अमरत्वाचे शाश्वतजीवन जगावे यासाठी मला पात्र बनव. तुझ्या संतांच्या सहवासात एक समृद्ध व प्रसन्न यज्ञ म्हणून माझ्या जीवनाचा स्वीकार होवो, आमेन.

आज प्रभू येशू आपल्या सर्वांना सार्वकालिक जीवनाच्या मार्गावरून चालण्यासाठी येणाऱ्या सर्व आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आवाहन करीत आहे. आपण त्याच्या कालवरीवरील वधस्तंभापर्यंत त्याची सोबत देण्यासाठी सहनशीलता, धैर्य व सामर्थ्य मागू या.
✝️

पहिले वाचन अनुवाद ३०:१५-२०
वाचक : अनुवाद या पुस्तकातून घेतलेले वाचन

"पाहा, आजचा दिवस मी आशीर्वाद आणि शाप म्हणून ठरवतो." मोशेने सर्व लोकांना बोलावले व त्यांना म्हटले, पाहा, जीवन व मरण, हानी व लाभ ही आज मी तुझ्यापुढे ठेवली आहेत. मी तुला आज्ञा करीत आहे की, तू आपला देव परमेश्वर याच्यावर प्रेम कर. त्याच्या मार्गाने चाल आणि त्याच्या आज्ञा, विधी व नियम ही पाळ, म्हणजे तू जिवंत राहून बहुगुणित होशील आणि ज्या देशाचे वतन करून घेण्यास तू जात आहेस तेथे तुझा देव परमेश्वर तुझे कल्याण करील. पण तुझे मन बदलून तू ऐकले नाहीस आणि बहकून अन्य देवाचे भजनपूजन केलेस तर मी तुला आज बजावून सांगतो की, तुझा खात्रीने नाश होईल. यार्देन उतरून जो देश तू वतन करुन घेण्यास जात आहेस तेथे तू चिरकाल राहणार नाहीस. आकाश आणि पृथ्वी ह्यांना तुझ्याविरुद्ध साक्षीला ठेवून आज मी सांगतो की, जीवन आणि मरण, आशीर्वाद आणि शाप ही तुझ्यापुढे ठेवली आहेत. तू जीवन निवडून घे म्हणजे तू व तुझा वंश जिवंत राहील. आपला देव परमेश्वर याच्यावर प्रेम कर. त्याची वाणी ऐक व त्याला धरून राहा. कारण त्यातच तुझे जीवन आहे. त्यातच तुझी आयुर्वृद्धी आहे असे केल्याने जो देश देण्याविषयी परमेश्वराने तुझे पूर्वज आब्राहाम, इसहाक व याकोब यांना शपथपूर्वक वचन दिले आहे आणि त्यात तुझी वस्ती होईल.

प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र :१-४,६
प्रतिसाद : प्रभूवर विश्वास ठेवणारा आनंद पावतो.

१) जो मनुष्य दुर्जनांच्या सल्ल्याप्रमाणे चालत नाही, 
पातक्याच्या वाऱ्याला उभा राहात नाही, 
किंवा देवनिंदकाच्या बैठकीत सामील होत नाही 
उलट जो प्रभूच्या धर्मशास्त्रात रमतो, 
त्याच्या धर्मशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य!

२) वाहत्या पाण्याजवळ एखादे झाड लावलेले असते 
यथाकाळी त्याला बहर येतो. त्याची पाने कोमेजत नाहीत 
अशा झाडाजवळ तो असतो. 
तो हाती घेतो ते सर्व सफल होते.

३)पण दुर्जनांचे तसे मुळीच नाही! 
वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे ते आहेत. 
सज्जनांच्या मार्गावर प्रभूचे लक्ष असते. 
परंतु दुर्जनांचा मार्ग विनाशाकडे जातो.



जयघोष 
आज आपली हृदये कठीण करू नका.
तर परमेश्वराचा आवाज ऐका.

शुभवर्तमान लूक ९:२२-२५

वाचक : लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

 “जो कोणी माझ्याकरिता आपल्या जिवाला मुकेल तो त्याला वाचवील. "

येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, "मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे भोगावी, वडील मंडळी, मुख्य याजक व शास्त्री ह्याच्याकडून नाकारले जावे, जिवे मारले जावे आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठवले जावे, ह्याचे अगत्य आहे."
त्याने सर्वांना म्हटले, "जर कोणी माझ्यामागे येऊ इच्छितो तर त्याने आत्मत्याग करावा व रोज स्वतःचा क्रूस उचलून घेऊन मला अनुसरावे.
जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो त्याला मुकेल, परंतु जो कोणी माझ्याकरिता आपल्या जिवाला मुकेल तो त्याला वाचवील. जर कोणा एका मनुष्याने सगळे जग मिळवले आणि स्वत:ला गमावले किंवा स्वतःचा नाश करुन घेतला तर त्याला काय लाभ ?"

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


चिंतन: परमेश्वर म्हणतो जर तुम्हाला माझ्या मागे यायचे असेल, तर सर्वप्रथम माझा वधस्तंभ उचलून मला अनुसरा. अनुवाद ह्या पुस्तकातील पहिल्या वाचनात देव त्याच्या लोकांसमोर जीवन किंवा मृत्यू, आशीर्वाद किंवा शाप, चांगले किंवा वाईट असे ठेवून लोकांना जीवन निवडण्याचा सल्ला देत आहे. जेव्हा आपण देवावर प्रेम करतो, देवाच्या आज्ञा पाळतो, देवाने दिलेल्या मार्गावर चालतो तेव्हा देव आपल्याला जीवन व आशीर्वाद निवडण्यास सांगतो. जेव्हा आपण येशूच्या विरोधात जातो, त्याच्या आज्ञा पाळत नाहीत तेव्हा आपण मृत्यू निवडतो. देवाच्या आज्ञा व त्याच्या शिकवणीनुसार चालून जीवन व आशीर्वाद निवडणे आपल्यासाठी खूप गरजेचे आहे. आजच्या शुभवर्तमानात काही विरोधाभासी उदाहरण आपल्याला पाहायला मिळते. येशू म्हणतो तुम्हाला तुमचा जीव वाचवायचा असेल तर येशू व त्याच्या राज्यासाठी आपण जीव गमावण्यास तयार असले पाहिजे. जर आपल्याला येशूच्या जीवनात सहभागी व्हायचे असेल तर त्याचा वधस्तंभ उचलून त्याचे अनुसरण केले पाहिजे. माणसाने सारे जग कमावले पण स्वतःचा आत्मा गमावला तर काय लाभ. याचाच अर्थ आपण जीवनामध्ये काही महत्वाचे निर्णय घेतो तेव्हा येशूला अनुसरून व त्याने दिलेल्या मार्गावर चालून आपण नवीन जीवन कमावू शकतो.

प्रार्थना :  हे प्रभू येशू, माझ्या जीवनातील सर्व प्रकारच्या वधस्तंभाचा स्वीकार करून तुला अनुसरण्यास प्रेरणा व कृपा दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या