Marathi Bible Reading | 1st Week of Easter Thursday 13th April 2023

 पुनरुत्थान पहिला सप्ताह 

गुरुवार  दि. १३ एप्रिल २०२३ 

" “तुम्ही का घाबरला आणि तुमच्या मनात तर्कवितर्क का उद्भवतात?"






   संत मार्टिन पहिले 
(पोप  वर्तनसाक्षी) 
✝️ 

 येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा स्वीकारलेली प्रत्येक व्यक्ती प्रभू येशूचे जीवन, मरण व पुनरुत्थानाची सहभागीदार बनलेली आहे. म्हणूनच प्रभू येशू। ख्रिस्ताच्या सुवार्तेची साक्ष जगाला देण्यासाठी सर्व ख्रिस्ती जनांना पाचारण करण्यात आले आहे. आपल्याला जगात भीती बाळगण्याचे कारण नाही, कारण पवित्र आत्म्याद्वारे सामर्थ्य ज्ञान व शहाणपणाची देणगी आपल्याला देण्यात आली आहे. आपल्या वाणीद्वारे आचरणाद्वारे व सेवेद्वारे देवराज्याची शुभवार्ता आपण इतरांपर्यंत देण्यासाठी प्रयत्नशील बनायचे आहे. आपणाला साक्ष कशी देता येईल यावर आज चिंतन करु या. प्रभू येशूच्या वचनाद्वारे आणि पुनरुत्थानाद्वारे सामर्थ्य व कृपा आपल्याला मिळाली आहे.
✝️

पहिले वाचन  प्रेषितांची कृत्ये ३:११-२६
वाचक : प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
 “तुम्ही जीवनाच्या अधिपतीला जिवे मारले पण देवाने त्याला मेलेल्यांमधून उठवले. 
तो पूर्वी पांगळा असलेला व आता बरा झालेला मनुष्य पेत्र व योहान ह्यांना बिलगून राहिला असता सर्व लोक आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे शलमोनची देवडी नावाच्या ठिकाणी धावत आले. हे पाहून पेत्राने लोकांना म्हटले, "अहो इस्त्राएल लोकांनो, ह्याचे आश्चर्य का करता? आपल्या सामर्थ्याने किंवा सुभक्तीने ह्याला चालायला लावले आहे असे समजून आम्हांकडे निरखून का पाहता? आब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांचा देव, आपल्या पूर्वजांचा देव, ह्याने आपला सेवक येशू याला गौरविले आहे. त्याला तुम्ही धरले आणि पिलातने त्याला सोडून देण्याचा निश्चय केला असताही त्याच्यासमक्ष तुम्ही त्याला नाकारले. जो पवित्र व नीतिमान त्याला तुम्ही नाकारले व खुनी पुरुष आम्हांला द्या अशी मागणी केली आणि तुम्ही जीवनाच्या अधिपतीला जिवे मारले. पण देवाने त्याला मेलेल्यांमधून उठवले ह्याचे आम्ही साक्षी आहो. त्याच्याच नावावरील विश्वासामुळे त्या नावाने ह्या ज्या माणसाला तुम्ही पाहता व ओळखता त्याला शक्तिमान केले आहे. येशूच्याद्वारे असलेल्या विश्वासाने ह्याला तुम्हा सर्वासमक्ष ही शरीरसंपत्ती प्राप्त झाली आहे."
“बंधुजनहो, आता तुम्ही, तसेच तुमच्या अधिकाऱ्यांनीही, जे केले ते अज्ञानामुळे केले हे मी जाणून आहे. परंतु देवाने, आपल्या ख्रिस्ताने, दुःख सहन करावे असे जे सर्व संदेष्ट्यांच्या मुखाने पूर्वी सांगितले होते ते त्याने त्याप्रमाणे पूर्ण केले. तेव्हा तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्चात्ताप करा व वळा, अशासाठी की, विश्रांतीचे समय प्रभूजवळून यावे आणि तुम्हांकरिता पूर्वी नेमलेला ख्रिस्त येशू ह्याला त्याने पाठवावे. सर्व गोष्टी पूर्वस्थितीला पोहोचण्याच्या ज्या काळाविषयी देवाने आरंभापासून आपल्या पवित्र संदेष्ट्यांच्या मुखाने सांगितले त्या कालापर्यंत येशूला स्वर्गात राहणे प्राप्त आहे. मोशेनेही म्हटलेच आहे, प्रभू देव तुम्हांसाठी माझ्यासारखा संदेष्टा तुमच्या बांधवामधून उभा करील. तो जे काही तुम्हांला सांगेल त्याप्रमाणे सर्व गोष्टींत त्याचे ऐका आणि असे होईल की, जो कोणी त्या संदेष्ट्यांचे ऐकणार नाही तो लोकातून अगदी नष्ट केला जाईल. आणखी शमुवेलपासून परंपरेने जितके संदेष्टे बोलले तितक्या सर्वांनी ह्या दिवसांविषयी सांगितले. तुम्ही संदेष्ट्याचे पुत्र आहा आणि तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीतील सर्व कुळे आशीर्वादित होतील, असे आब्राहामशी बोलून देवाने तुमच्या पूर्वजांबरोबर केलेल्या कराराचेही तुम्ही पुत्र आहा. देवाने आपल्या सेवकाला उठवून प्रथम तुम्हांकडे पाठवले, ह्यासाठी की, त्याने तुम्हां प्रत्येकाला तुमच्या दुष्कृत्यांपासून वळून जाण्याचा आशीर्वाद द्यावा.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ८:२,५-९
प्रतिसाद :   प्रभो, तुझे नाव कितीतरी थोर आहे!

१) हे प्रभो, आमच्या स्वामी,
 साच्या भूतलावर तुझे नाव कितीतरी थोर आहे!
तू मर्त्य मानवाची आठवण करावी, 
यत्किंचित मानवजातीची तू पर्वा करावी,
असा तो कोण ?

२ )तरीपण देवापेक्षा तू त्याला किंचित कनिष्ठ केले आहेस, 
त्याला वैभव व मोठेपणा यांनी अलंकृत केले आहेस. 
आपल्या हातच्या कलाकृतींवर तू त्याला स्वामित्व दिले आहेस,
 सारे काही त्याच्या चरणांपाशी ठेवले आहेस.

३) शेरडेमेंढरे, गुरेढोरे, अगदी एकूणएक जंगली जनावरे, 
आकाशातील पाखरे, समुद्रातले मासे,
 सागरात संचार करणारे प्राणीदेखील 
तू त्याच्या चरणापाशी ठेवले आहेत.

जयघोष
आलेलुया, आलेलुया !
प्रभूचा हा दिवस आहे, ह्या दिवशी आपण उल्हास व आंनद करुया. 
आलेलुया !


शुभवर्तमान लूक   ४:३५-४८
वाचक :लूक लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 
"ख्रिस्ताने दुःख सोसावे, तिसऱ्या दिवशी मेलेल्यांमधून उठावे."

प्रेषितांनी वाटेतल्या घटना आणि येशूने भाकर मोडली तेव्हा आपण त्याला कसे ओळखले हे निवेदन केले. ते ह्या गोष्टी सांगत असता येशू स्वतः त्यांच्यामध्ये उभा राहिला आणि त्यांना म्हणाला, "तुम्हांस शांती असो!" पण ते घावरून भयभीत झाले आणि भूत पाहत आहोत असे त्यांना वाटले. त्याने त्यांना म्हटले, “तुम्ही का घाबरला आणि तुमच्या मनात तर्कवितर्क का उद्भवतात? माझे हात आणि माझे पाय पाहा, मीच तो आहे. मला चाचपून पाहा. जसे मला हाडमांस असलेले पाहता तसे भुताला नसते." असे म्हणून त्याने त्यांना आपले हातपाय दाखवले. मग आनंदामुळे त्यांस ते खरे न वाटून ते आश्चर्य करीत असता त्याने त्यांना म्हटले, "येथे तुम्हांजवळ खाण्यास काही आहे काय ?" मग त्यांनी त्याला भाजलेल्या माशाचा तुकडा दिला. तो घेऊन त्याने त्यांच्यादेखत खाल्ला.
मग तो त्यांना म्हणाला, "मी तुमच्याबरोबर असताना तुम्हांला सांगितलेली माझी वचने हीच आहेत की, मोशेचे नियमशास्त्र, संदेष्टे व स्तोत्रे ह्यात माझ्याविषयी जे लिहिलेले आहे ते सर्व पूर्ण होणे आवश्यक आहे." तेव्हा त्यांना शास्त्र समजावे म्हणून त्याने त्यांचे मन उघडले आणि त्याने त्यांना म्हटले, "असे लिहीले आहे की, ख्रिस्ताने दुःख सोसावे, तिसऱ्या दिवशी मेलेल्यांमधून उठावे आणि येरुशलेमपासून आरंभ करून सर्व राष्ट्रांना त्याच्या नावाने पश्चात्ताप व पापक्षमा घोषित करण्यात यावी. तुम्ही ह्या गोष्टींचे साक्षी आहा.' "
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 

चिंतन:“आजच्या शुभवर्तमानात आपण पाहत आहोत, पुनरुत्थित ख्रिस्त एकदा आपल्या शिष्यांना दर्शन देत आहे. “तुम्हांस शांती असो.” असे अभिवादन ख्रिस्त आपल्या शिष्यांना देत आहे. जगाला शांती देणारा शांतीदूत एकमेव ख्रिस्तच आहे. आज जग ऐहिक गोष्टीतून शांती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. आज जगात खूप सुखसोयी आहेत. आपली पिढी अनेक सुविधांनी संपन्न आहे. आपली पिढी अनेक सुविधांनी संपन्न असली तरी ती शांती प्रिय आहे का? १०० वर्षाअगोदर लोकांना सुविधा नव्हत्या परंतू ते खूप शांतीप्रिय होते, कारण त्यांच्याकडे ख्रिस्त होता. ख्रिस्त हा एकमेव देव आहे. देवाचा पुत्र आहे. केवळ तोच आपल्याला शांती देऊ शकतो, हे जग नव्हे. ख्रिस्ताचा आपल्या जीवनात स्वीकार करून त्याच्या वचनाप्रमाणे जगून सर्व वाईट गोष्टींचा त्याग करून ख्रिस्ताची शांती चला आपणही अनुभवूया.
    
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्या पुनरुत्थानाची साक्ष जगाला देण्यास व तुझी सुवार्ता जगजाहीर करण्यास आम्हाला कृपा सामर्थ्य दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या