Marathi Bible Reading | 1st Week of Easter Friday 14th April 2023

 पुनरुत्थान पहिला सप्ताह 

शुक्रवार दि. १४ एप्रिल २०२३ 

“अरे, हा तर प्रभू आहे!"



   संत टायबिर्शियस, मॅक्सिमस आणि व्हेलेरियन

- रक्तसाक्षी (...)
✝️ 

 त्याची हकीगत अशी: व्हेलेरियन हा रोम शहरातील राज्यव्यवस्थे मध्ये सिनेटर ह्या महत्त्वाच्या पदावर कार्य करीत होता. सिसिलिया (सण २२ नोव्हें.) नावाच्या सुंदर, भक्तिमान व सोज्वळ स्त्रीशी त्याची सोयरीक झाली होती. लग्नाचा समारंभ मोठ्या थाटामाटात संपन्न झाल्यानंतर व्हेलेरियन ह्याला समजले की, आपल्या ख्रिस्ती पत्नीने गुप्तपणे आमरण कौमार्यपदाचे व्रत घेतलेले आहे. व्हेलेरियन जरी परधर्मीय असला तरी स्वभावाने अतिशय सृजनशील होता. आपल्या पत्नीने घेतलेला शुद्धतेचा वसा टाकू नये म्हणून त्याने तिला कौमार्यपद अढळ ठेवण्यास प्रोत्साहन दिले. दरम्यानच्या काळात त्याने आपला भाऊ टायबिर्शिअस त्याच्यासह ख्रिस्ती धर्माचा व्यवस्थित अभ्यास केला व बाप्तिस्मा स्वीकारला. इतकेच नव्हे तर सिसिलिया हिला तिची परोपकारकृत्ये व दयाकृत्ये करण्यास त्यांनी भरपूर पाठिंबा व प्रोत्साहन दिले.
ही गोष्ट अमालिखअस नावाच्या प्रांत प्रमुखाला समजली. आपल्याच राजदरबारातील आपले दोन खंदे पुरस्कर्ते उघड उघड ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करतात ही गोष्ट त्याला मुळीच पचणारी नव्हती. त्याने त्या दोघांना एकत्र आपल्या भेटीस बोलावले व ख्रिस्ती धर्म सोडून दयावा असा आज्ञावजा हुकूम सोडला.परंतु प्रांतप्रमुखाची कोणतीही धमकी व्हेलेरियन व टायबिर्शिअस ह्यांच्या एकनिष्ठेला पराभूत करू शकली नाही. शेवटी दोघांना नजरकैदेत डांबण्यात आले.
पुढे त्यांना मॅक्सिमस नावाच्या एका मूर्तिपूजक शताधिपतीच्या हाती सोपविण्यात आले. आता मात्र एकंदर प्रकरणाला भलतीच कलाटणी मिळाली. मॅक्सिमस ह्याने ह्यांचा छळ करण्याचे सोडून त्यांच्याकडून ख्रिस्ती धर्मश्रद्धेचे धडे घेतले आणि एके दिवशी त्यांच्या हातून ख्रिस्ती धर्माची दीक्षाही घेतली. ही वार्ता सम्राटाच्या कानावर जाताच तिघांनाही कंठस्नान घालण्यात आले. ख्रिस्तसभेने अगदी आरंभीच्या काळातच त्यांना रक्तसाक्षी म्हणून घोषित केले.
✝️

पहिले वाचन प्रेषितांची कृत्ये ४:१-१२
वाचक : प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
   "तारण दुसऱ्या कोणाकडून नाही."
पेत्र आणि योहान लोकांबरोबर बोलत असता त्यांच्यावर याजक, मंदिराचा सरदार व सदुकी हे चालून आले. कारण ते लोकांना शिक्षण देऊन, येशूच्या द्वारे मेलेल्यांमधून पुन्हा उठणे आहे असे उघडपणे सांगत होते, ह्याचा त्यांना संताप आला. तेव्हा त्यांनी त्यांना अटक केली आणि संध्याकाळ झाली होती म्हणून सकाळपर्यंत त्यांना चौकीत ठेवले. तथापि वचन ऐकणाऱ्यातील पुष्कळांनी विश्वास ठेवला आणि अशा पुरुषांची संख्या सुमारे पाच हजार झाली.
दुसऱ्या दिवशी यहुद्यांचे अधिकारी, वडील व शास्त्री, हे आणि प्रमुख याजक हन्ना आणि कयफा, योहान, आलेक्सांद्र व प्रमुख याजकाच्या कुळातील जितके होते तितके येरुशलेममध्ये एकत्र जमले आणि त्यांनी त्यांना मध्ये उभे करून विचारले, "तुम्ही हे कोणत्या सामर्थ्याने किंवा कोणत्या नावाने केले ?" तेव्हा पेत्र पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्यांना म्हणाला, "अहो लोकाधिकाऱ्यांनो व वडीलजनांनो, एका दुर्बल मनुष्यावर कसा उपकार झाला म्हणजे तो कशाने बरा झाला, ह्या विषयी आमची आज चौकशी व्हायची असेल, तर तुम्हा सर्वांना व सर्व इस्राएल लोकांना हे कळावे की, ज्याला तुम्ही क्रुसावर खिळून मारले, ज्याला देवाने मेलेल्यांमधून उठवले, त्या नाझरेथकर येशू ख्रिस्ताच्या नावाने हा मनुष्य बरा होऊन तुमच्यापुढे उभा राहिला आहे. तुम्ही बांधकाम करणाऱ्यांनी तुच्छ मानलेला जो दगड कोनशिला झाला तो हाच आहे आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, कारण ज्याच्याद्वारे आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही.
 प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ११८:१-२.४,२२-२४, २५-२७अ
प्रतिसाद :   बाधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड कोनशिला झाला आहे.

१) प्रभूला धन्यवाद द्या कारण तो चांगला आहे.
 त्याचे वात्सल्य अनंत आहे. 
आता इस्राएलच्या घराण्याने म्हणावे, 
“त्याचे वात्सल्य अनंत आहे."
प्रभूला भिणाऱ्यांनी म्हणावे,
"त्याचे वात्सल्य अनंत आहे."

२) बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड कोनशिला झाला आहे. 
ही परमेश्वराची करणी आहे. ती आमच्या दृष्टीने अद्भुत आहे.
 प्रभूचा हा दिवस आहे, ह्या दिवशी आपण उल्हास व आनंद करुया.
प्रभो, आमची भरभराट कर.

३) प्रभो, आम्हाला वाचव. 
प्रभूचे नाम धारण करून येणारा धन्य आहे. 
प्रभू सदनातून आम्ही तुम्हांला आशीर्वाद देतो. 
प्रभू परमेश्वर आमचा प्रकाश आहे.


जयघोष
आलेलुया, आलेलुया !
प्रभूचा हा दिवस आहे, ह्या दिवशी आपण उल्हास व आंनद करुया. 
आलेलुया !


शुभवर्तमान योहान २१:१-१४
वाचक :योहाना लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 
वाचक :“येशूने येऊन भाकर घेतली व त्यांना दिली."
तिबिर्याच्या समुद्राजवळ येशू शिष्यांना पुन्हा प्रकट झाला. शिमोन पेत्र, दिदुम म्हटलेला थोमा, गालिलातील काना येथला नथनेल, जब्दीचे मुलगे व त्याच्या शिष्यांपैकी दुसरे दोघेजण हे एकत्र जमले असता, शिमोन पेत्र त्यांना म्हणाला, “मी मासे धरावयास जातो," ते त्याला म्हणाले, “आम्हीही तुझ्याबरोबर येतो." तेव्हा ते निघून मचव्यात बसले, पण त्या रात्री त्यांना काहीही मिळाले नाही.
मग पहाट होत असता येशू समुद्रकिनाऱ्यावर उभा होता, तथापि तो येशू आहे असे शिष्यांनी ओळखले नव्हते. तेव्हा येशूने त्यांना म्हटले, “मुलांनो, तुमच्याजवळ काही खावयाला आहे काय ?” त्यांनी त्याला उत्तर दिले, “नाही." त्याने त्यांना म्हटले, “मचव्याच्या उजव्या बाजूला जाळे टाका म्हणजे तुम्हांला भरपूर सापडेल." म्हणून त्यांनी ते टाकले, तेव्हा माशांचा घोळका लागल्यामुळे ते त्यांना ओढवेना. ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती तो पेत्रला म्हणाला, “अरे, हा तर प्रभू आहे!" हे ऐकून शिमोन पेत्रने अंगरखा घालून तो कमरेशी गुंडाळून घेतला, कारण तो उघडा होता आणि त्याने समुद्रात उडी टाकली. दुसरे शिष्य माशांचे जाळे ओढीत होडीतून आले, कारण ते किनाऱ्यापासून दूर नव्हते, सुमारे दोनशे हातांवर होते.
मग किनाऱ्यावर उतरल्यावर त्यांनी कोळशाचा विस्तव आणि त्यावर घातलेली मासळी व भाकर पाहिली. येशूने त्यांना म्हटले, "तुम्ही इतक्यात धरलेल्या मासळीतून काही आणा." तेव्हा शिमोन पेत्रने मचव्यावर चढून एकशे त्रेपन्न मोठ्या माशांनी भरलेले जाळे किनाऱ्यावर ओढून आणले, तितके असतानाही जाळे फाटले नाही. येशू त्यांना म्हणाला, “या, न्याहारी करा." तेव्हा तो प्रभू आहे असे त्यांना समजले, म्हणून “आपण कोण आहा?" हे त्याला विचारायला शिष्यांतील कोणी धजला नाही. येशूने येऊन भाकर घेतली व त्यांना दिली, तशीच मासळीही दिली. येशू मेलेल्यातून उठल्यावर आपल्या शिष्यांना प्रकट झाल्याची ही तिसरी वेळ.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 

चिंतन:“ज्या पेत्राला खडक समजून ख्रिस्ताने ख्रिस्तसभा उभारण्याचे स्वप्न बाळगलेले होते तोच पेत्र यहुद्यांच्या भीतीने आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण पाहात आहोत की, तो त्याच्या सहकाऱ्याबरोबर मासळी पकडण्यास जात आहे. ख्रिस्ताने पेत्राला म्हटले होते, तू माणसे धरणारा होशील. ज्या पेत्राने ख्रिस्ताचा अगदी जवळून अनुभव घेतलेला होता. “तू देवाचा पुत्र" अशी साक्ष दिली होती, त्या पेत्राने आज पुन्हा एकदा ख्रिस्ताला नाकारलेले आपल्याला आजच्या शुभवर्तमानात दिसत आहे. ही पेत्राची स्वार्थी संकुचित वृत्ती स्पष्ट करत आहे. माणूस हा आपल्या संसारात किती अडकलेला आहे. पेत्राचे आपल्या सहकाऱ्यांबरोबर मासळी पकडण्यासाठी जाणे ह्याचे दर्शन देत आहे. मी म्हणजे कुटुंब, माझा व्यवसाय, माझा पैसा ह्याच्या पलीकडे माणूस स्वतःची ओळख करून घेण्यासाठी अपात्र ठरत आहे. आजच्या पहिल्या वाचनात आपण पाहत आहोत की, माणसाला देवाने किती शक्तीशाली बनविलेले आहे. पेत्र जो पुन्हा पुन्हा मागे फिरत होता त्या पेत्राने पहिल्या वाचनात पाच हजार लोकांना स्नानसंस्कार दिलेला आहे. ही माणसाची खरी ओळख. माणसाने ठरवले तर पेत्राप्रमाणे किती सुंदर पवित्र जीवन जगू शकतो. ह्याचे दर्शन पेत्र आपणांस देत आहे. आपल्या कुटुंबापर्यंत मर्यादित जीवन न जगता आपली ओळख कुटुंबाच्या पलीकडे कशी नेता येईल ह्याचा विचार आपण प्रत्येकाने करावा
    
प्रार्थना : -हे प्रभू येशू, तुझ्या सत्याचे दर्शन आम्हाला घडव व तुझ्या पुनरुत्थानाचे  साक्षीदार बनण्यास प्रेरणा दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या