सामान्यकाळातील चौदावा सप्ताह
शुक्रवार १० जुलै २०२६
कारण बोलणारे तुम्ही नाही, तर तुमच्या पित्याचा आत्मा हाच तुमच्या ठायी बोलणारा आहे. For it is not you who speak, but the Spirit of your Father speaking through you.
रोम शहरात सम्राट अंतोनियस ह्यांच्या कारकीर्दीत घडलेली ही घटना. त्याच्या राज्यात फेलिसिटी नावाची एक साध्वी, नीतिमान आणि शालीन विधवा आपल्या सात मुलांसह राहत होती. आपल्या पतीच्या निधनानंतर तिने आमरण कौमार्य आणि परोपकार ह्या सद्गुणांची जोपासना केलेली होती. तिच्या सात्विक जीवनाकडे पाहून असंख्य मूर्तीपूजक खोट्या दैवताकडून ख्रिस्ताकडे व ख्रिस्ती धर्माकडे वळले होते. त्यामुळे स्थानिक मूर्तीपूजक धर्मगुरू चवताळले होते.
या धर्मगुरूंनी एकत्र येऊन सम्राटाकडे अशी तक्रार केली की ही स्त्री आपल्या धर्माचा उघड उघड प्रचार करीत आहे आणि सम्राटने नेमून दिलेले धार्मिक विधी पार पाडीत नाही. त्यामुळे आपल्या साम्राज्याचे संरक्षक असलेल्या दैवतांना तिने आपल्या मुलांसह सर्वासमक्ष यज्ञबळी अर्पण करावा अशी राजाने आज्ञा दयावी.
ही तक्रार राजाच्या कानी जाताच त्याने रोमचा प्रमुख प्रिफेक्ट प्युब्लियस ह्याला या प्रकरणात लक्ष घालण्याचा आदेश दिला. त्याने फेलिसिटी आणि तिच्या सात मुलांना एकत्र करून म्हटले, "हे बघ फेलिसिटी, तुझ्या कोवळ्या बालकांकडे दयापूर्ण नजरेने पाहा. त्यांच्यातील काहीजण तारुण्याने मुसमुसलेले आहेत. लवकरच त्यांना राजदरबारात मानाचे स्थान दिले जाणार आहे." त्यावेळी त्या पवित्र स्त्रीने उत्तर दिले, "तुझी कळकळ हा खरा मोहपाश आहे आणि तू मला जी सहानुभूती दाखवित आहेस तो क्रूरतेचा छुपा अविष्कार आहे." त्यानंतर आपल्या मुलांकडे वळून तिने म्हटले, "माझ्या प्रिय मुलांनो, स्वर्गाकडे आपली दृष्टी लावा, तिथे कधीही ढळणार नाहीत अशा सन्मान व गौरवाच्या जागा जुलै महिन्यातील संत सोहळे तुम्हाला बहाल करण्यासाठी येशू थांबलेला आहे. त्याच्यावरील श्रद्धेशी विश्वासू रहा आणि धैर्यान या संघर्षाशी मुकाबला करा."
या एकंदर प्रकरणाने चक्रावून गेलेला प्युब्लिअस ह्याने त्या मातेला आपल्या सात मुलांसह मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली. त्यानंतर त्याने सात भावांना एकामागून एक असे आपणाकडे बोलावून घेतले आणि वेगवेगळी आमिषे दाखवून आश्वासने देऊन आणि शेवटी भीती घालून आपल्या दैवताला भजण्यास परोपरीने विनविले. त्याचा सर्व वादविवाद आणि धाकदपटशा व्यर्थ गेला. सर्व भावांना त्यानंतर फटके मारण्यासाठी शिपायांच्या हाती देण्यात आले व शेवटी त्यांना तुरुंगात टाकण्यात आले.
आपला अधिकार अपुरा पडत आहे ह्याची जाणीव प्युब्लिअस ह्याला झाल्याने त्याने हे संपूर्ण प्रकरण सम्राट अंतोनियस ह्याच्या हाती सोपविले. ह्या सात भावांना वेगवेगळ्या न्यायाधिशांकडे पाठवून त्यांना विविध प्रकारची शिक्षा
ठोठावली जावी असा आदेश सम्राटने दिला. त्यानुसार जानुआरिअस ह्या थोरल्या भावाला खांबाला बांधून मरेपर्यंत फटके मारण्यात आले. फेलिक्स व फिलीप ह्या दोघांना दंडुक्यांनी बडविण्यात आले व त्यातच त्यांचा अंत झाला. सिल्वानुस ह्याला सर्व लोकसमुदायासमोर डोंगरकड्यावरून खाली ढकलून देण्यात आले आणि शेवटच्या तिघांचा आलेक्झांडर, विटालीस आणि मार्शिआलिस ह्यांचा शिरच्छेद करण्यात आला. सात दुःखांची ही तरवार आपल्या हृदयातून आरपार गेल्याची भावना त्या विधवा मातेने "याचि देही याचि डोळा" अनुभवली. शेवटी तिलाही ठार करण्यात आले.
✝️
