सामान्यकाळातील चौदावा सप्ताह
गुरुवार ९ जुलै २०२६
'स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.' रोग्यांना बरे करा, मेलेल्यांना उठवा, कुष्ठ रोग्यांना शुद्ध करा, भुते काढा.
The kingdom of heaven is at hand. Heal the sick, raise the dead, cleanse lepers, cast out demons.
सोळाव्या शतकात कॅल्विन नावाचा एक प्रसिद्ध विचारवंत होऊन गेला. मात्र पुढे त्याने ख्रिस्ती धर्माच्या शिकवणुकीविरुद्ध उघड उघड बंड पुकारले आणि कॅल्विनिझम नावाची विचारसरणी मानणाऱ्यांचा एक पंथ स्थापन केला. प्रॉटेस्टंट पंथासमानच त्यांची शिकवण होती. कालांतराने हा पंथ इतका व्यापक बनला की त्यांनी कॅथलिक शिकवण पाळणाऱ्या लोकांचा छळ करायला सुरवात केली.
हॉलंडमधील गोर्कुम या धर्मप्रांतात त्यांनी एक मोठे अमानुष हत्याकांड घडवून आणले. १९ धर्मगुरू आणि व्रतस्थांना त्यांनी ठार मारले. त्यापैकी बारा जणांना केवळ अतिपवित्र साक्रामेंतातील येशूच्या खऱ्या उपस्थितीवरील विश्वासापायी क्रुसावर खिळण्यात आले. त्यात एक धर्मगुरू तब्बल ९० वर्षांचे वृद्ध होते.
उरलेल्या सात जणांपैकी जेम्स लाकॉप्स ह्यांना शिडीवर उलटे टांगवण्यात आले आणि सहा जणांना खांबावर टांगून मारण्यात आले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची निर्जीव शरिरे एका सार्वजनिक खड्ड्यात टाकण्यात आली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे इ. स. १६१६ पर्यंत म्हणजे १९४४ वर्षापर्यंत त्यातील एकही देह कुजला नाही. पुढे त्यांचे अवशेष बेल्जियम येथील क्रुसेल्सच्या फ्रान्सिस्कन चर्चमध्ये पुरण्यात आले. इ. स. १८६७ साली त्यांना संत म्हणून घोषित करण्यात आले.
प्रभू येशूला लोकांचा कळवळा आला कारण, 'मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे लोक बहकलेले होते.' प्रभू येशूने अशा सर्वांना जवळ केले. त्यांच्या व्यथा समजून घेतल्या व त्यांना मार्गदर्शन केले. देवाचे वचन आणि देवराज्याची घोषणा करीत प्रभू येशूने अंधांना दृष्टी, मुक्यांना वाचा व बहियांना श्रवण शक्ती दिली. आजारी, अपंग आणि पीडित जनांना विश्वासात बळकट करुन महान चमत्कारांद्वारे देवाचे प्रकटीकरण केले. प्रभू येशू सर्वांचा मेंढपाळ, सरंक्षण कर्ता, मार्गदर्शक, प्रकाश व मुक्तीदाता बनला.
आपण जर देवापासून, चांगुलपणापासून, सत्यापासून बहकून दूर गेलो असल्यास प्रभू येशूला आपला प्रभू आणि मेंढपाळ म्हणून त्याचा स्वीकार करु या. त्याच्या वचनावर विश्वास ठेवून त्याच्या कृपेच्या छायेत राहण्यासाठी प्रार्थना करु या.
✝️
