पुनरुत्थान चौथा सप्ताह
शनिवार दि. २७ एप्रिल २०२४
ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे, तर आम्हांला पिता दाखवा असे तू कसे म्हणतोस ?Whoever has seen me has seen the Father. How can you say, 'Show us the Father'?
संत झिटा
श्रद्धावान आणि भक्तिमान कुटुंबात जन्माला आलेली झिटा ही मुलगी देवाच्या नजरेतून अत्यंत पवित्र आणि विश्वासू असे जीवन जगत असे. तिचे आईवडील ख्रिस्ती जीवन काटेकोरपणे जगत होते व तिची एक बहीण सिस्टर्शियन संघात धर्मभगिनी होती. तिचे काका एक मठवासी होते आणि जिवंतपणीच त्यांना संत मानले जात होते. वयाच्या १२ व्या वर्षी झिटा इटलीतील लुक्का येथल्या एका कुटुंबात स्वयंपाकीण म्हणून काम करू लागली. मरेपर्यत ती त्याच कुटुंबाची सेवाचाकरी करीत होती.
ती अतिशय कर्तव्यदक्षतेने व निष्ठेने काम करी. रात्री-अपरात्री ती प्रार्थना करण्यासाठी उठे. पवित्र मिस्सामध्ये सहभाग घेणे. वारंवार उपवास करणे, आपला जेवणातील काही भाग गोरगरिबांसाठी राखून ठेवणे अशी दयाकृत्ये तिने पूर्णतः आत्मसात करून घेतली होती.एकदा एक भिकारी थंडीने कुडकुडत होता. तिने आपले अंथरूण पांघरूण त्याला देऊन टाकले आणि ती जमिनीवर झोपू लागली. तिच्या अशा ह्या वागण्यामुळे तिचे सहकारी नोकर तिचा उपहास करीत. सर्वजणी तिला टोचून बोलत आणि उघडउघड तिचा अपमान करीत असत.
नम्रता, सौम्यता, सहनशीलता आणि देवावरील विशुद्ध प्रेम इत्यादी गुणांमुळे ती ह्या पडझडीच्या काळात टिकून राहिली. इतकेच नव्हे तर साधेपणाने व नम्रतेने तिने आपल्या शत्रूंच्या कारवायांवर मात केली व अनेकांची मर्जी संपादन केली. तिच्या घरमालकांना देखील तिचा चांगुलपणा दिसून आला. त्यामुळे झिटा म्हणजे आपल्या घराची शान आहे, आपल्या कुटुंबातील मौल्यवान देणगी आहे ह्याविषयी त्याची खात्री पटली. आपल्या मुलांचे संगोपन करण्याची जबाबदारी त्यांनी तिच्यावर सोपविली. इतकेच काय तिला संपूर्ण घराच्या व्यवस्थापनाचे कामही दिले.
आता झिटाच्या कामाची व्याप्ती वाढली. परंतु त्यातही वेळात वेळ काढून ती गरीब व आजारी लोकांना भेटी देत असे. गोरगरिबांविषयी तिच्या मनात असलेल्या तळमळीमुळे देवाने देखील गोरगरिबांत तिला दर्शन देणे सुरू ठेवले.
नाताळची संध्याकाळ होती. संपूर्ण कुटुंब रात्रीच्या मिस्साला जाण्यासाठी तयारी करीत होते. थंडीत तर हातपाय गारठत होते. त्यामुळे घरमालकाने स्वत:चा एक कोट झिटा हिच्या खांद्यावर टाकीत तिला म्हटले, "आजची रात्र तू हा कोट वापर.” आनंदाने तिने तो फरचा कोट परिधान केला. देवळाच्या प्रवेशद्वारापाशी जेव्हा ती पोहोचली तेव्हा अंगावर लक्तरे पांघरलेला एक भिकारी तिच्या नजरेस पडला. त्या भिकाऱ्याने झिटाकडे कोट देण्याची विनंती केली. झिटाने इकडे तिकडे पाहिले व कोट त्या भिकाऱ्याला देत म्हटले, “मी देवळात मिस्साला जात आहे. परंतु येईपर्यंत तू हा कोट पांघर. ह्यानंतर परत जाताना मला हा कोट परत दे. हा कोट माझ्या मालकाचा आहे.” त्या भिकाऱ्याने तो कोट घेतला. मिस्सा आटोपल्यानंतर झिटा त्या माणसाला शोधू लागली. परंतु तो माणूस बेपत्ता झाला होता.
झिटा आता चिंताग्रस्त झाली. आपल्या मालकाला तोंड कसे द्यायचे असा विचार करीत उदास मनाने ती घरात शिरली. तिच्या अंगावर कोट नाही हे पाहून तिचा मालक तिच्यावर तुटून पडला. ख्रिस्मसचा आनंद एकमेकांना देण्याऐवजी शिव्याशापांची आग त्या घरात ओकली जाऊ लागली. थोडक्याच वेळात सर्वजण केक कापण्यासाठी मेजाभोवती जमा झाले तेव्हा दारावरची बेल वाजू लागली. दरवाजा उघडून पाहताच एक अपरिचित व्यक्ती हातात तो फरचा कोट घेऊन उभी होती. त्याने तो कोट झिटाच्या हाती दिला. घरमालक त्या माणसाला काही विचारणार इतक्यात तो अदृश्य झाला परंतु घडलेल्या घटनेमुळे कुटुंबातील वातावरण एकदम बदलून गेले. त्या कुटुंबात आता नाचगाणे सुरू झाले. त्या दिवसापासून ज्या चर्चच्या प्रवेशद्वारापाशी झिटाला तो भिकारी भेटला होता त्या दाराला "देवदूताचे दार" असे नाव पडले.
आपली साधीसुधी कामे अगदी टापटीपपणे व व्यवस्थितरित्या पार पाडणे हा झिटाचा गुणविशेष होता. त्यामुळे देवळात व आसपासच्या परिसरात ती लवकरच नावारुपाला आली. २७ एप्रिल १२७८ रोजी ती मरण पावली. ज्या चर्चमध्ये ती नित्य नेमाने मिस्साला जाई त्या संत फर्डियानो चर्चमध्ये तिला पुरण्यात आले. ती घरकामगारांची आश्रयदाती संतीण मानली जाते.
“मोलकरीण जर उद्योगी नसेल तर ती काय कामाची? कामाविना पावित्र्य हे केवळ ढोंग आणि पोकळ डामडौल आहे." - संत झिटा
प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना शिक्षण देत असताना विश्वास
बळकट करण्याचे आणि प्रार्थना करण्याचे प्रबोधन केले. पिता आणि पुत्र ह्यांचे ऐक्य प्रभू येशूने स्पष्ट करून सांगितले आणि आशेचा दीप प्रेषितांमध्ये
प्रज्वलित केला,
संत पौल व बर्णबा यहुदेतर जनतेमध्ये प्रभू येशूची सुवार्ता पसरविण्यास गेल्याचा वृत्तांत आहे. प्रभू येशूवरील विश्वासामुळे त्यांनी सुवार्तेची घोषणा केली आणि अनेकांना प्रभूकडे वळविले. त्यांच्याद्वारे अनेक अद्भूत कृत्ये घडली. आज प्रभू येशू आपल्या सर्वांना पाचारण करून विश्वासात टिकून राहण्यास व त्याची सुवार्ता इतरांना देण्यासाठी आवाहन करीत आहे. प्रभूच्या नावात सामर्थ्य आहे. आपण त्याच्याकडे आज अंत:करणापासून विश्वासाचे दान मागू या. कारण प्रभू म्हणतो, "तुम्ही जे काहीमाझ्या नावाने मागाल ते मी करीन". आपल्या सभोवताली अनेकांना अजूनही प्रभू येशूची ओळख नाही. आपण आपल्या वाणीद्वारे व कृतिद्वारे प्रभू येशूची सुवार्ता घोषविण्यासाठी प्रयत्नशील बनू या. प्रभू येशू विश्वासाची देणगी देऊन पवित्र आत्म्याचे वरदान आपल्याला देत आहे. त्याच्या हाकेला प्रतिसाद देऊन आपण त्याच्या शुभवर्तमानाचे साक्षीदार बनण्यास प्रेरणा व कृपा मागू या.
पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ये १३:४४-५२
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
"पाहा, आम्ही परराष्ट्रीयांकडे वळतो."
पुढल्या शब्बाथ दिवशी बहुतेक सर्व नगर देवाचे वचन ऐकावयाला जमले. पण लोकसमुदायाला पाहून यहुदी लोकांना हेव्यामुळे चेव आला आणि पौल जे बोलला त्याला विरोध करून ते अपशब्द बोलू लागले. तेव्हा पौल आणि बर्णबा हे निर्भीडपणे म्हणाले; “देवाचे वचन प्रथम तुम्हांला सांगावयाचे अगत्य होते. तरी ज्याअर्थी तुम्ही त्याचा अव्हेर करता आणिआपणांला सार्वकालिक जीवनाकरता अयोग्य ठरवता त्याअर्थी पाहा, आम्ही परराष्ट्रीयांकडे वळतो. कारण प्रभूने आम्हांला आज्ञा दिली आहे की, मी तुला राष्ट्रांचा प्रकाश असे करून ठेवले आहे, ह्यासाठी की, पृथ्वीच्या दिगंतापर्यंत तू तारण व्हावेस.”
हे ऐकून परराष्ट्रीय आनंदित झाले आणि त्यांनी देवाच्या वचनाचा महिमा वर्णिला. तेव्हा जितके सार्वकालिक जीवनासाठी नेमलेले होते तितक्यांनी विश्वास ठेवला आणि प्रभूचे वचन सर्व प्रांतात पसरत गेले. तेव्हा यहुदी लोकांनी भक्तिमान आणि कुलीन स्त्रियांना आणि नगरातील मुख्य पुरुषांना चिथवले आणि पौल व बर्णबा ह्यांचा छळ करून त्यांना आपल्या सीमेबाहेर घालवून दिले. त्यामुळे ते आपल्या पायांची धूळ त्यांच्यावर झटकून इकुन्या येथे गेले. इकडे शिष्य आनंदाने आणि पवित्र आत्म्याने पूर्ण झाले.
प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :
Acts 13:44-52
The next Sabbath almost the whole city gathered to hear the word
of the Lord. But when the Jews saw the crowds, they were filled with jealousy, and began to contradict what was spoken by Paul, reviling him. And Paul and Barnabas spoke out boldly, saying, "It was necessary that the word of God be spoken first to you. Since you thrust it aside, and judge yourselves unworthy of eternal life, behold, we are turning to the Gentiles. For so the Lord has commanded us, saying, "I have made you a light for the Gentiles, that you may bring salvation to the ends of the earth." And when the Gentiles heard this, they began rejoicing and glorifying the word of the Lord, and as many as were appointed to eternal life believed. And the word of the Lord was spreading throughout the whole region. But the Jews incited the devout women of high standing and the leading men of the city, stirred up persecution against Paul and Barnabas, and drove them out of their district. But they shook off the dust from their feet against them and went to Iconium. And the disciples were filled with joy and with the Holy Spirit.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ९८:१-४
प्रतिसाद : पृथ्वीच्या कानाकोपऱ्यांनी आमच्या देवाचा विजय पाहिला आहे.
१. नवीन गीत गाऊन प्रभूचे गुणगान करा,
कारण त्याने अलौकिक कृत्ये केली आहेत.
त्याने आपल्या हाताने आणि पवित्र बाहुबलाने
विजय संपादन केला आहे.
२. प्रभूने आपल्या विजयाची द्वाही फिरवली आहे.
राष्ट्रांसमक्ष आपली न्यायपरायणता प्रकट केली आहे.
इस्राएलच्या घराण्यावरील आपले अढळ प्रेम
आणि निष्ठा यांची त्याने आठवण ठेवली आहे.
३ पृथ्वीच्या कानाकोपऱ्यांनी
आमच्या देवाचा विजय पाहिला आहे.
पृथ्वीवरील सर्व लोकहो, प्रभूचा जयजयकार करा
जयघोष करून आनंदाने गा. त्याचे गुणगान गा.
Psalm 98:1, 2-3ab, 3cd-4
All the ends of the earth have seen the salvation of our God.
O sing a new song to the Lord,
for he has worked wonders.
His right hand and his holy arm
have brought salvation. R
The Lord has made known his salvation,
has shown his deliverance to the nations.
He has remembered his merciful love
and his truth for the house of Israel. R
All the ends of the earth have seen
the salvation of our God.
Shout to the Lord, all the earth;
break forth into joyous song,
and sing out your praise. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
असे लिहिले आहे की, ख्रिस्ताने दुःख सोसावे आणि तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठावे.
आलेलुया !
Acclamation:
If you abide in my word, you are truly my disciples, and you will know the truth, says the Lord.
शुभवर्तमान योहान १४:७-१४
वाचक : योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे."
येशूने त्याच्या शिष्यांना म्हटले, "मी कोण आहे हे तुम्ही ओळखले असते तर तुम्ही माझ्या पित्यालाही ओळखले असते. आतापासून पुढे तुम्ही त्याला ओळखता आणि तुम्ही त्याला पाहिलेही आहे."
फिलीप त्याला म्हणाला, "प्रभो, आम्हांला पिता दाखवा म्हणजे आम्हांला पुरे आहे." येशूने त्याला म्हटले, “फिलीप मी इतका काळ तुम्हाजवळ असूनही तू मला ओळखत नाहीस काय ? ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे, तर आम्हांला पिता दाखवा असे तू कसे म्हणतोस ? मी पित्यामध्ये आणि पिता माझ्यामध्ये आहे असा विश्वास तू धरीत नाहीस काय ? ज्या गोष्टी मी तुम्हांला सांगतो त्या मी आपल्या स्वतःच्या सांगत नाही. माझ्यामध्ये राहणारा पिता स्वतःची कार्ये करतो. मी पित्यामध्ये आणि पिता माझ्यामध्ये आहे हे माझे तुम्ही खरे माना, नाहीतर माझ्या कृत्यांमुळे तरी माझे खरे माना."
मी तुम्हांला सत्य तेच सांगतो, मी जी कृत्ये करतो, ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील आणि त्यापेक्षा मोठी करील, कारण मी पित्याकडे जातो. पुत्राच्या ठायी पित्याचा गौरव व्हावा म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन. तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर मी ते करीन."
"प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:
John 14:7-14
At that time: Jesus said to his disciples, "If you had known me, you would have known my Father also. From now on you do know him and have seen him." Philip said to him, "Lord, show us the Father, and it is enough for us." Jesus said to him, "Have I been with you so long, and you still do not know me, Philip? Whoever has seen me has seen the Father. How can you say, 'Show us the Father'? Do you not believe that I am in the Father and the Father is in me? The words that I say to you I do not speak on my own authority, but the Father who dwells in me does his works. Believe me that I am in the Father and the Father is in me, or else believe on account of the works themselves. Truly, truly, I say to you, whoever believes in me will also do the works that I do; and greater works than these will he do, because I am going to the Father. Whatever you ask in my name, this I will do, that the Father may be glorified in the Son. If you ask me for anything in my name, I will do it."
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: देवाविषयी असलेली भूक सर्वांनाच असते. ज्यांना आवडले किंवा ज्यांच्या मनामध्ये येते ते देवावर विश्वास ठेवतात आणि ज्यांना आवडत नाही व ज्यांना ते नको असते मग ते ठेवणार नाहीत असं नाही तर परमेश्वरावरील विश्वास हा माणसाचा स्वभाव आहे. प्रत्येक माणूस हा देवाच्या विश्वासाने जणूकाही जन्मलेला असतो. माणसाची व्याख्यासुद्धा 'धार्मिक माणूस' (religious human being) अशी केली जाते. धर्म जणूकाही माणसाच्या नसानसात व रक्तात आहे हे तत्त्वज्ञान्यांनी अभ्यासपूर्वक सांगितलेले आहे. देवाची भूक जरी सर्वांना असली तरी देव कोण आहे? हे आपण जाणून घेतलं पाहिजे. संत अगस्तीन म्हणतात की पहिल्या प्रथम आपण हे जाणून घेतले पाहिजे की कुठल्या देवाच्या मागे तुम्ही जात आहात? हे अगोदर खात्री करून घ्या नाहीतर फार उशीर होईल आणि देवाच्या नावाने तुम्ही भलत्याच कोणाच्या मागे लागला होतात असं व्हायला नको, यासाठी एक अट प्रभू येशू ख्रिस्त फिलीप, प्रेषीत व आपल्यापुढे ठेवतो. देवाला ओळखण्यासाठी प्रथम खिस्त कोण आहे हे समजून घेणे अत्यावश्यक आहे. आपल्याला जर देव भेटायला पाहिजे असे वाटत असेल तर आपण स्वतः आपल्या कल्पनेने केलेला देव नसावा पण दुर्दैवाने आपण आपल्या कल्पनेतला देव बनवून आपले धार्मिक जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असतो आणि मग आपल्याला त्याच्यात फारसा रस वाटत नाही. परमेश्वर म्हणजे एखादे झाड किंवा सोन्याची अंडी घालणारी काही कोंबडी नाही. म्हणजे झाड जसं हलवलं म्हणजे आपल्याला जे हवं आहे ते त्वरीत मिळणार अशा कल्पना आपण करून ठेवतो आणि तशाच प्रकारची कल्पना शिष्यांनी केली. फिलीपसुद्धा कदाचित नकळत त्या विचारांना व स्वतःच्या कल्पनांनी केलेल्या देवाला बळी पडला होता असे दिसते.
प्रार्थना :- हे प्रभू येशू, तुझी वचने आत्मसात करून विश्वासाने, धैर्याने व प्रेमाने तुझी सेवा करण्यास आम्हांला पात्र बनव, आमेन..
✝️
0 टिप्पण्या