सामान्यकाळातील २५ वा सप्ताह
बुधवार दिनांक २४ सप्टेंबर २०२५
संत पीटर नोलास्को, पेन्याफोर्टचे संत रेमंड आणि अॅरागॉनचा राजा जेम्स ह्यांनी इ.स. १२३३ साली बार्सेलोना (स्पेन) येथे स्थापन केलेल्या 'दयामाता संघा'ने सारासेनच्या गुलामगिरीतून ख्रिस्ती गुलामांना मुक्त करण्याचे प्रेषितकार्य सुरू केले. त्यासाठी लागेल ती खंडणी या संस्थेतील धर्मगुरू व धर्मबंधू स्वकष्टाने मिळवून देत असत. त्यांनी पवित्र मरियेच्या सन्मानार्थ हा सण साजरा करण्यास सुरुवात केली.
हळूहळू फ्रान्स आणि स्पेन देशांनी हा सण साजरा करण्यास प्रारंभ केला व शेवटी पोप इनोसंट तेरावे ह्यांनी १६९६ साली संपूर्ण जगभरच्या ख्रिस्तसभेने सदर सण साजरा करावा अशी अधिकृत घोषणा केली. वसईतील मर्सेस या ठिकाणी मर्सेस माऊली (दयामाता) चे चर्च आहे व सप्टेंबर महिन्याच्या शेवटी दयामातेचा सण तिथे साजरा केला जातो.इंग्लडच्या परिवर्तनासाठी आणि चुकीच्या धार्मिक शिकवणुकीपासून भाविकांचे संरक्षण व्हावे म्हणून दयामातेचा धावा केला जातो. सैतानाच्या विषारी तावडीतून पाप्यांची सुटका व्हावी, शुद्धीस्थानातील आत्म्यांचे तारण व्हावे म्हणून देखील पवित्र मरियेकडे मध्यस्थीची याचना केली जाते.
0 टिप्पण्या