सामान्यकाळातील २८ वा सप्ताह
बुधवार दि. १५ ऑक्टोबर २०२५
कॉन्व्हेंटमध्ये असताना तेरेजा अचानक आजारी पडली. त्या आजारपणाच्या काळात तिने चिंतनशील प्रार्थना आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. त्याच काळात तिने संत अगस्तीनने लिहिलेले “आत्मनिवेदन” वाचून काढले आणि ती संपूर्णत: देवाला शरण आली, त्याकाळी अनेक धार्मिक संस्थामध्ये शिस्त थोडीशी सैल झालेली होती. सातत्याने होणाऱ्या पाहुण्यांच्या वर्दळीमुळे प्रार्थनामय जीवनाकडे थोडेफार दुर्लक्ष होत असे. तेरेसा म्हणे, प्रार्थना आणि स्वार्थलोलुपता ह्यांचे मेतकूट कधीही जमू शकत नाही. ह्याच कारणास्तव आता आपल्या जीवनात केवळ देवालाच प्रथम स्थान देण्याचा निर्णय तिने घेतला.
प्रार्थनामय जीवनातील तिची प्रगती वाखाणण्याजोगी होती. त्यामुळेच आता ती अशा अवस्थेप्रत येऊन पोहोचली की, दृष्टांत, साक्षात्कार आणि असामान्य कृपेचा अनुभव तिला वारंवार येऊ लागला, स्वत: ख्रिस्त तिच्याशी बोलला त्यावेळी आपल्या हृदयातून प्रेमाचा अग्निबाण आरपार जाताना तिने अनुभवला. मधुराभक्तीचा अनुभव ती आता घेऊ लागली. अशा भक्तीमध्ये भक्त आणि परमेश्वर परस्परांस पती-पत्नी मानतात. सुरुवाती, सुरुवातीला ह्या साक्षात्कारांचा अर्थ तिला समजेना. ती गोंधळून जाई. आपल्या आध्यात्मिक गुरूसमोर मन मोकळे करताना तिच्या मनाची घालमेल होई. आध्यात्मिक गुरूंच्या मनातही शंका आणि गैरसमज निर्माण होत. हा साक्षात्कारच की सैतानाचा फसवा डाव याचे आकलन करणे कठीण जाई.
बघता बघता अशी २० वर्षे गेली. या २० वर्षामध्ये तिने बरीच खडतर तपश्चर्या अनुभवली होती. मात्र त्याचे फलित तिला आता मिळू लागले. जगातील सर्व प्राणीमात्रापासून, आपत्ती व मोहांपासून ती दूर राहू लागली. ख्रिस्ताचे अनुकरण परिपूर्णरित्या करण्याचा एकच ध्यास तिला लागला, “जी प्रार्थना केवळ देवाला प्रसन्न करते, आपल्यामध्ये बदल घडवून आणते आणि चांगले कृत्य करण्यास आपल्याला प्रेरणा देते तीच खरीखुरी प्रार्थना असते. आपल्या स्वत:च्या समाधानासाठी केलेली प्रार्थना ही प्रार्थना नसतेच मुळी!"
संत पीटर (आल्कान्ताराचे, सण १८ ऑक्टो.) आणि संत फ्रान्सिस बोर्जिया (सण १० ऑक्टो.) ह्या तिच्या आध्यात्मिक गुरूंना कळून चुकले, की देवाचे सामर्थ्य तेरेजाठायी कार्यरत झालेले आहे आणि इ. स. १५६१ मध्ये आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने कार्मेलाईट संस्थेचे नूतनीकरण करण्याची आज्ञा तिला दिली. त्यावेळी तिचे वय ४६ वर्षांचे होते.
आपल्या आयुष्याची ऊर्वरित वर्षे तिने बराच विरोध सहन करून १७ कॉन्व्हेन्ट्स आणि १५ मठ उभारण्यात घालविली. तिच्या मते कोणतीही गोष्ट आपल्याला विचलित करू शकत नाही. सर्व गोष्टी येतात नि जातात. फक्त देव तेवढा राहतो. धीराने सर्व गोष्टी मिळविता येतात. आपला देव तेवढा पुरेसा आहे (God alone Suffices).
आपल्या अधिकाऱ्यांच्या आज्ञेनुसार तिने 'परिपूर्ण मार्ग' 'राजभवन' आणि 'देवप्रीतीची संकल्पना' अशी आध्यात्मिक पुस्तके लिहिली. अध्यात्म क्षेत्रातील अनेक अग्रेसर पंडितांमध्ये तेरेजानेही आपला ठसा उमटविला.
संत तेरेजा ऑक्टोबरच्या ४ तारखेला १५८२ साली मरण पावली. पोप ग्रेगरी पंधरावे ह्यांनी १६२२ साली तिला संतपद दिले. देऊळमातेने तिला धर्मपंडिता (डॉक्टर ऑफ द चर्च) हा मरणोत्तर किताब बहाल केला.
चिंतन : जेव्हा तुम्ही पवित्र ख्रिस्तशरीर स्वीकारता तेव्हा आपल्या शरीराचे डोळे बंद करा आणि आत्म्याचे डोळे उघडा. त्यानंतर आपल्या हृदयाच्या केंद्रस्थानी प्रभू येशू ख्रिस्त विराजमान झालेला पहा. - संत तेरेजा
आपण सुध्दा अनेकदा आपले बाह्य शरीर स्वच्छ ठेवून पोकळ भक्तीचा देखावा करीत असतो. चांगला पोषाख करुन सभ्यपणाचा आव आणायचा मात्र अंतर्यामी स्वार्थ, हेवा, मत्सर, द्वेष, राग, जुलूम अशा प्रकारच्या दुष्टपणाने आचरण करणाऱ्या सर्वांचा प्रभू आज निषेध करीत आहे. अंतःकरणात साचलेला हा अशुध्दपणा प्रभू येशू आज बाहेर काढण्यास सांगत आहे. प्रभू म्हणतो, 'जे आंत आहे त्याचा दानधर्म करा म्हणजे पाहा तुम्हांस सर्व शुद्ध आहे.' परमेश्वराला अपेक्षित शुद्धता, चांगुलपणा आणि| परोपकार तसेच परमेश्वराठायी सर्व समर्पित करण्यासाठी आज प्रभूकडे विशेष कृपा मागू या.
विश्वासाने प्रभूच्या आज्ञा आपल्याला पाळता याव्यात आणि सत्य वचनांवर आधारित अशी प्रभूची उपासना व भक्ती आपल्याला करता यावी म्हणून नम्रतेने प्रभू चरणी नतमस्तक होऊ या. आध्यात्मिकतेत वाढत असताना पवित्र आत्म्याची फळे म्हणजेच
प्रीति, आनंद, सहनशीलता, सौम्यता, परोपकार, शांती, चांगुलपणा व विश्वासूपणाने जीवन जगण्यासाठी कृपा मागू या.