सामान्यकाळातील दहावा सप्ताह
शनिवार दि. १३ जुन २०२६
“बाळा, तू आमच्याबरोबर असा कां वागलास ?”
पवित्र मरियेला परमेश्वराने आपल्या पुत्राची माता होण्यासाठी निवडले असतांना ती फार गोंधळून गेली होती. तरीसुद्धा परमेश्वराची इच्छा प्रमाण मानून तिने देवाच्या योजनेला पूर्णपणे प्रतिसाद दिला. अखिल मानवांच्या मुक्ततेसाठी ती देवपुत्राची माता बनली.
आज ख्रिस्तसभा पवित्र मरियेच्या निष्कलंक हृदयाचा सण साजरा करीत आहे. पवित्र मरियेला बाळपणापासूनच श्रद्धेचे बाळकडू पाजलेले होते. प्रार्थना, नीतिमत्ता, परोपकार व सेवा यामुळे तिच्या जीवनात देवासाठी प्रेम व बंधुजनांसाठी तळमळ निर्माण झाली होती. गाब्रियल दुताने तिला 'कृपापूर्ण' म्हटले आहे, कारण ती खरोखर निष्कलंक आणि निर्मळ होती.
परमेश्वराची दासी बनलेली मरिया आजच्या शुभवर्तमानात सुद्धा आपणांस गोंधळून गेलेली आढळते. बारा वर्षांचा बाळ येशू येरुशलेमच्यामंदिरात हरवला असतांना ती बावरली. ती म्हणाली, 'बाळा, तू आमच्याबरोबर असा कां वागलास?' परंतू सत्य समजताच मरियामाता अंतर्मुख बनली. तिने ती घटना हृदयाच्या गाभाऱ्यात साठवून ठेवली, कारण ती येशू बाळा विषयीचे भाकित जाणून होती. पवित्र मरियेसारखे पवित्र, प्रार्थनामय व सेवाभावी जीवन जगण्यासाठी आपल्या सर्वांना प्रेरणा मिळावी म्हणून तिच्या चरणाशी एकत्र येऊ या. तिच्या निष्कलंक हृदयातून सर्वांसाठी कृपेचा व प्रेमाचा झरा वाहत आहे.
पवित्र मरियेच्या निष्कलंक हृदया आम्हा पाप्यांवर दया कर!
