सामान्यकाळातील पहिला सप्ताह
गुरुवार दि. १६ जानेवारी २०२५
✝️
पवित्र आत्मा म्हणतो, 'आज जेव्हा तुम्ही त्याची वाणी ऐकाल तेव्हा रानातील परीक्षेच्या दिवशी इस्राएल लोकांनी चीड आणली होती तशी तुम्ही आपली मने कठीण करू नका. तेथे तुमच्या वाडवडिलांनी कसोटीस लावून माझी परीक्षा केली आणि चाळीस वर्षे माझी कृत्ये पाहिली.' त्यामुळे त्या पिढीवर संतापून मी म्हणालो, 'हे सतत भ्रमिष्ट अंत:करणाचे लोक आहेत, ह्यांनी माझे मार्ग जाणले नाहीत.' म्हणून मी रागाने शपथ वाहून म्हणालो, 'हे माझ्या विसाव्यात निश्चित येणार नाही.' बंधुजनहो, जिवंत देवाला सोडून देण्याइतके अविश्वासाचे दुष्ट मन तुम्हांतील कोणाचेही असू नये म्हणून जपा. जोपर्यत 'आज' म्हटलेला वेळ आहे तोपर्यंत तुम्ही एकमेकांना प्रतिदिवशी बोध करा. हेतू हा की, पापाच्या फसवणुकीने तुम्हातील कोणी कठीण होऊ नये. कारण जर आपण आपला आरंभीचा विश्वास शेवटपर्यंत दृढ ठेवला तरच आपण ख्रिस्ताचे भागीदार ठरु.
एक कुष्ठरोगी येशूकडे आला आणि त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याला विनंती करून म्हणाला, "आपली इच्छा असली तर मला बरे करायला आपण समर्थ आहा." तेव्हा त्याला त्याचा कळवळा आला. त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला आणि म्हटले, "माझी इच्छा आहे, बरा हो,” तेव्हा लागलेच त्याचे कुष्ठ जाऊन तो बरा झाला. मग त्याने त्याला सक्त ताकीद देऊन लगेच पाठवून दिले आणि सांगितले, "पाहा, कोणाला काही सांगून नको. प्रमाण पटावे म्हणून जाऊन स्वत:स याजकाला दाखव आणि आपल्या शुद्धीकरता मोशेने नेमलेले आर्पण कर." पण त्याने तेथे जाऊन घोषणा करुन त्या गोष्टीला इतकी प्रसिद्धी दिली की येशूला उघडपणे शहरात जाता येईना. म्हणून तो बाहेर अरण्यातच राहिला, तरी लोक चहूकडून त्याच्याकडे आलेच.
✝️